Mushaal malik | भारतीय तुरुंगात बंद असलेल्या दहशतवाद्याची पत्नी पाकिस्तानात बनली मंत्री
Mushaal malik | मुशाल मलिक पाकिस्तान सरकारमध्ये कुठली भूमिका बजावणार?. मुशाल मलिक आणि यासीन मलिक यांचा 22 फेब्रुवारी 2009 रोजी रावळपिंडीमध्ये निकाह झाला. 2005 मध्ये यासीन मलिक पाकिस्तानात गेला होता.
इस्लामाबाद : भारतीय तुरुंगात बंद असलेल्या दहशतवाद्याची पत्नी पाकिस्तानात मंत्री बनली आहे. मुशाल मलिक हिला पाकिस्तान सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. पाकिस्तानातील कार्यवाहक पंतप्रधान अनवर उल हक यांच्या कॅबिनेटमध्ये तिला स्थान मिळालं आहे. मुशाल मलिक पीएम अनवर उल हक यांची स्पेशल असिस्टेंट असणार आहे. तिने गुरुवारी संध्याकाळी मंत्रिपदाची शपथ घेतली. मुशाल मलिक शिवाय जलील अब्बास जिलानी परराष्ट्र मंत्री, सरफराज बुग्ती गृह मंत्री, डॉ श्मशाद अख्तर वित्त मंत्री, जनरल (रि) अनवर अहमद यांना संरक्षण मंत्री बनण्यात आलं आहे. कार्यवाहक पीएम अनवर उल हक यांच्या कॅबिनेटचा काल शपथविधी झाला.
मुशाल मलिकचा नवरा भारतीय तुरुंगात बंद आहे. जम्मू-काश्मीरमधील फुटीरतवादी नेता आणि टेरर फंडिंग प्रकरणात यासीन मलिक अटकेत आहे.
मुशालची दहशतवाद्याबरोबर कधी ओळख झाली?
मुशाल मलिक आणि यासीन मलिक यांचा 22 फेब्रुवारी 2009 रोजी रावळपिंडीमध्ये निकाह झाला. 2005 मध्ये यासीन मलिक पाकिस्तानात गेला होता. त्यावेळी त्याची मुशाल बरोबर ओळख झाली. मुशालने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून ग्रॅज्युएशन केलं आहे. मुशालची आई रेहाना मलिक पाकिस्तान मुस्लिम लीग या नवाज शरीफ यांच्या पक्षाच्या महिला आघाडीची सचिव होती. तिचे वडिल अर्थशास्त्री आहेत. मुशालचा भाऊ परराष्ट्र विषयांचा जाणकार आहे. मुशाल इस्लाबाद येथे आपल्या बहिणीसोबत राहते.
यासीन किती वर्षापासून तुरुंगात?
यासीन मलिक 2019 पासून तुरुंगात बंद आहे. 2017 साली टेरर फंडिंग प्रकरणात त्याला अटक झाली होती. NIA ने यासीन विरोधात गुन्हा दाखल केला. मागच्यावर्षी मे महिन्यात दिल्लीतील एक न्यायालयाने यासीनला दोषी ठरवलं. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मुलीच्या अपहरणाचा आरोप
यासीन मलिकला UAPA सह सर्व आरोपांमध्ये दोषी ठरवलं. 2017 साली त्याच्यावर काश्मीर खोऱ्यात अशांतता निर्माण करण्यासाठी दहशतवादी कृत्य करण्याचा आरोप होता. यासीनचा जन्म 1966 साली श्रीनगरच्या मैसुमा भागात झाला. त्याच्यावर 1989 साली तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबैया सईदच्या अपहरणाचा आणि श्रीनगरमध्ये एअर फोर्सच्या जवानांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेत चौघांचा मृत्यू झाला होता.