terror attack threat | दहशतवादी तयार आहेत, 26/11 सारखे बॉम्बस्फोट करणार, ई-मेल करणारा आहे कोण?
terror attack threat | एटीएसकडून आलेल्या ई-मेलनंतर तांत्रिक विश्लेषणाच्या साह्याने तपास सुरु करण्यात आला. धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या तपासासाठी गुजरात एटीएस ओडिशामध्ये पोहचले. त्या ठिकाणावरुन जावेद अंसारी याला अटक करण्यात आली आहे.
अहमदाबाद | 15 मार्च 2024 : मुंबईत 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी अजूनही देशवासीयांच्या मनात ताज्या आहेत. 2008 मध्ये झालेल्या या हल्ल्यात 166 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. तसेच 200 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. आता देशात 26/11 सारखा हल्ला करण्याचा धमकी देणारा मेल गुजरातमधील सरकारी संस्थांना आला. त्यानंतर गुजरात सायबर सेल आणि एटीएस सक्रीय झाले. 6 मार्च रोजी आलेल्या या ई-मेलचा तपास सुरु करण्यात आला. शेवटी हा ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीस अटक करण्यात आली.
कोणी केला ई-मेल
एटीएसकडून आलेल्या ई-मेलनंतर तांत्रिक विश्लेषणाच्या साह्याने तपास सुरु करण्यात आला. धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या तपासासाठी गुजरात एटीएस ओडिशामध्ये पोहचले. त्या ठिकाणावरुन जावेद अंसारी याला अटक करण्यात आली आहे. आरोपी कार पेंटिंग आणि पॉलिशिंगची कामे करतो. जावेद याने धमकी देणाऱ्या ई-मेलमध्ये 26/11 सारखे स्फोट घडवून आणण्याचा दावा केला होता. जावेदला अटक करुन आणल्यानंतर एटीएसकडून त्याची कसून चौकशी सुरु आहे. जावेद याच्यासोबत आणखी कोणी आहे का? याचाही तपास केला जात आहे. एसटीएसची टीम जावेदची संपूर्ण कुंडली शोधून काढत आहेत.
पुणे दहशतवादी अटक प्रकरणात खुलासा
पुणे दहशतवादी प्रकरणात महत्वाचे अपडेट समोर आले आहे. पुण्यातील कोंढव्यातच बॉम्ब तयार करण्याचे संशयित दहशतवाद्यांनी प्रशिक्षण घेतले होते. मागच्या वर्षी अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. कोंढवा परिसरात बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेत काही ठिकाणी नियंत्रित स्फोटही घडवून आणण्याची माहिती चौकशीतून उघड झाली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट दहशतवाद्यांनी पुण्यातून रचला होता. NIA च्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दोन जणांच्या अटकेनंतर प्रकरण उघड
मागच्या वर्षी दोन दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर या दोन दहशतवाद्यांच्या चौकशीत बॉम्बस्फोटात बदल धक्कादायक माहिती उघड झाली. NIA कडून याप्रकरणी आणखी चार दहशतवाद्यांच्या विरोधात मुंबई विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.