Monsoon Rain : राज्यात वरुणराजाचे पुनरागमन, 5 दिवस धोक्याचे, काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे नदी, नाले ओढेच नाहीतर धरणांनीही सरासरी ओलांडली आहे. त्यामुळे अनेक धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला परिणामी नदीलगतच्या गावांमध्ये पाणी शिरल्याच्या अनेक घटना राज्यात घडल्या होत्या. आता पावसाने हजेरी लावली तर लागलीच पाणीपातळीत वाढ होणार आहे.आगोदरच धरणे ओव्हरफ्लो आहेत. यातच पावसाने हजेरी लावली तर नद्या अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीच्या जवळ असू शकतात.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून (Monsoon Rain) मान्सूनचा राज्यात लपंडाव सुरु असला आगामी 5 दिवस पुन्हा पाऊस सक्रीय होणार आहे. 10 ते 12 दिवसानंतर पाऊस पुन्हा सक्रीय होत असल्याने शेतकऱ्यांची तर चिंता वाढलेली आहेच पण यापूर्वीच सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला असताना पुन्हा (Heavy Rain) अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज (IMD) हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्यामुळे नदीपात्रालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय पाणीपातळीतही वाढ होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ऑगस्टमध्ये सर्वसाधारणच पाऊस राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला होता मात्र, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा धोका वाढला आहे. त्यामुळे पिकांचे तर नुकसान होणारच आहे पण नागरिकांना सतर्क रहावे असा सल्लाही देण्यात आला आहे.
या भागात अतिमुसळधार पाऊस
गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने जनजीवन सुरळीत झाले होते. शिवाय रखडलेली शेतीकामेही मार्गी लागली होती. पण राज्यात पुन्हा पावसाला सुरवात होणार असल्याने चित्र बदलणार आहे. विशेषत: पुढील 24 तासांमध्ये म्हणजेच शनिवारी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 5 दिवस पावसामध्ये सातत्य राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
5 Aug; राज्यात 5 दिवस मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून मुसळधार ते अतिमुसळधारची शक्यता.काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता. खाली दिलेले इशारे शनिवार पासून आहेत. २४ तासांत दक्षिण कोकण,दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार,मेघगर्जनेची शक्यता. pic.twitter.com/4MqJ0qrUaR
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 5, 2022
नद्या ओलांडणार धोक्याची पातळी
जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे नदी, नाले ओढेच नाहीतर धरणांनीही सरासरी ओलांडली आहे. त्यामुळे अनेक धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला परिणामी नदीलगतच्या गावांमध्ये पाणी शिरल्याच्या अनेक घटना राज्यात घडल्या होत्या. आता पावसाने हजेरी लावली तर लागलीच पाणीपातळीत वाढ होणार आहे.आगोदरच धरणे ओव्हरफ्लो आहेत. यातच पावसाने हजेरी लावली तर नद्या अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीच्या जवळ असू शकतात. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तर पिके हातची गेली
यंदा खरिपाच्या पेऱ्यापासून पिकांवर टांगती तलवार आहे. खरिपातील पेरणी होताच राज्यात मुसळधार पाऊस झाला होता शिवाय पावसामध्ये तब्बल एक महिना सातत्यही होते. त्यामुळे सातत्याने पावसाचे पाणी शेतजमिनीमध्ये साचून राहिले तर अनेक ठिकाणी जमिनीही वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. आता कुठे पिके बहरू लागली होती. पीक वाढीच्या अनुशंगाने शेतकऱ्यांनी मशागतीची कामे केली पण आता पाऊस झाला तर मात्र, खरीप हातचा गेलाच अशी स्थिती आहे. दरवर्षी पावसाअभावी पिके धोक्यात असतात यंदा मात्र पावसामुळे पिकांचे नुकसान होऊ लागले आहे.