PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पंडित नेहरू यांचं तोंडभरून कौतुक; काय म्हणाले नेहरूंबद्दल?
उद्यापासून नव्या संसद भवनात लोकसभेचं कामकाज चालणार आहे. जुन्या संसद भवनातील कामकाजाचा आज शेवटचा दिवस होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेला संबोधित करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला.
नवी दिल्ली | 18 सप्टेंबर 2023 : संसदेचं विशेष अधिवेशन सुरू झालं आहे. उद्यापासून हे अधिवेशन संसदेच्या नव्या इमारतीत सुरू होणार आहे. त्यामुळे आज जुन्या संसद भवनातील कामकाजाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. या भाषणात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू ते संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नरसिंह राव, चंद्रशेखर, व्हीपी सिंग, अटलबिहारी वाजपेयी ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंतच्या पंतप्रधान आणि इतर नेत्यांचा मोदींनी गौरवाने उल्लेख केला. जुन्या संसदेतील ऐतिहासिक कामगिरी, ऐतिहासिक निर्णय आणि ऐतिहासिक क्षणांनाही मोदींनी उजाळा दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरू यांचा गौरवाने उल्लेख करत त्यांचं तोंडभरून कौतुक केलं.
विशेष अधिवेशनाला सुरुवात होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेला संबोधित केलं. देशाला प्रगतीपथावर नेण्याची ही संधी आहे. आपण जुनं संसद भवन सोडून नव्या संसदेत प्रवेश करणार आहोत. असं असलं तरी जुनं संसद भवन येणाऱ्या पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देत राहील. जेव्हा आपण जुनं घर सोडून नव्या घरात प्रवेश करायला जातो तेव्हा जुन्या आठवणी मनात रुंजी घालत असतात. आज या जुन्या संसदेतही आपलं मन असं भरून आलंय. या संसदेत आपण चांगले वाईट अनुभव घेतले. वादविवाद पाहिलेत. याच संसदेतून स्वतंत्र भारताच्या नवनिर्मिताच्या घटना घडल्या आहेत. जेव्हा मी पहिल्यांदाच खासदार झालो आणि संसदेत प्रवेश केला. तेव्हा मी याच भावनेने संसदेच्या पायऱ्यांवर डोकं ठेवलं होतं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
तो क्षण माझ्यासाठी भावूक
मी संसदेत आलो तो क्षण माझ्यासाठी भावनेने ओथंबलेला होता. मी त्याची कल्पनाही करू शकत नाही. रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपणारा माणूस संसदेपर्यंत पोहोचतो ही या लोकशाहीची ताकद आहे. एक दिवस देश माझ्यावर एवढं प्रेम करेल याचा मी कधीच विचार केला नव्हता. या संसदेत दलित, आदिवासी आणि महिलांचं योगदान वाढत चाललं आहे. महिलांनी या संसदेची शोभा वाढवली आहे. त्यांचंही या संसदेत मोठं योगदान आहे. तब्बल 7500 हून अधिक खासदारांनी या संसदेत योगदान दिलं आहे. समाजातील सर्व वर्गातील लोक या संसदेत आहेत, असं मोदी यांनी सांगितलं.
कोरोना काळातही खासदार संसदेत आले
कोरोना काळातही खासदार संसदेत आले. खासदारांनी या कठिण प्रसंगातही आपलं कर्तव्य पार पाडलं. राष्ट्राचं काम कधीच थांबता कामा नये, या भावनेतूनच सर्वजण आले. स्वातंत्र्याच्या काळात आपल्या देशाबाबत एक शंका व्यक्त केली जात होती. हा देश देश म्हणून एकसंघ राहील की नाही? भारतीय लोक एकत्रित नांदतील की नाही? अशी शंका व्यक्त केली जात होती. पण आपण सर्वांना चुकीचं ठरवलं आहे, असं उद्गारही त्यांनी काढलं.
तीन पंतप्रधान गमावले
या संसदेत 2 वर्ष 11 महिने संविधान सभा पार पडली. संविधान देशासाठी मार्गदर्शक बनलं. नेहरू, शास्त्रींपासून ते अटलबिहारी वाजपेयी आणम मनमोहन सिंगपर्यंतच्या नेत्यांनी या सभागृहाचं नेतृत्व केलं. सरदार वल्लभभाई पटेल, अडवाणी यांच्यासह अनेक नेते सामान्यांचे आवाज बनले. याच काळात पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे तीन पंतप्रधान आपण गमावले. त्यांना साश्रू नयनांनी निरोप दिला, असं सांगतानाच संसदेवरील हल्ल्यातील शहिदांना त्यांनी अभिवादन केलं.
नेहरूंचं भाषण प्रेरणादायी
याच संसदेत बॉम्ब धमाक्याने भगत सिंग यांनी ब्रिटिश राजवटीला हादरवून सोडलं होतं. पंडित नेहरू यांनी दिलेलं याच संसदेतील भाषण आजही प्रेरणा देत असतं. नेहरूंच्या भाषणाची गुंज या सभागृहात आजही ऐकायला येते. त्यांचं हे भाषण आजही देशाला दिशा देणारं आहे. सरकार येत जात राहील. पण देश राहिला पाहिजे, असं अटलबिहारी वाजपेयी आपल्या भाषणात म्हणाले होते. त्यांचं हे भाषण आजही आठवलं जातं, असं सांगतानाच जुन्या संसदेत घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांचीही त्यांनी उजळणी केली.
आंबेडकरांनी संविधान दिलं
याच सभागृहात बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिलं. बाबासाहेबांनी देशाला वॉटर पॉलिसी दिली. देशात औद्योगिकीकरण होणं आवश्यक आहे, असं बाबासाहेब वारंवार सांगायचे, असंही मोदी यांनी सांगितलं. यावेळी मोदींनी व्हीपी सिंग, चंद्रशेखर, चौधरी चरण सिंह आदी नेत्यांचाही गौरवाने उल्लेख केला.