शानदार, जबरदस्त Yashobhoomi चा पहिला व्हिडिओ समोर, पाहुन तुम्हाला ही अभिमान वाटेल
भारत मंडपम नंतर आता यशोभूमीची भव्यता पाहुन सर्व भारतीयांना त्याचा अभिमान वाटेल. G20 सारख्या शिखर परिषदांचे आयोजन करण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे. जगभरातील लोकांना याची भव्यता पाहता येणार आहे. कसं आहे यशोभूमी पाहा व्हिडिओ.
नवी दिल्ली : G20 साठी तयार करण्यात आलेला भारत मंडपमने जगाला आकर्षित केलं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या द्वारका सेक्टरमध्ये इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्सपो सेंटर (IICC) चे उद्घाटन करणार आहेत. त्याला ‘यशोभूमी‘ असे नाव देण्यात आले आहे. आता यशोभूमीचा पहिला आतला व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही यशोभूमीची भव्यता पाहू शकता. यशोभूमी ही जगातील सर्वात मोठ्या MICE (मीटिंग्ज, इन्सेन्टिव्ह, कॉन्फरन्स आणि एक्झिबिशन) सुविधांपैकी एक असेल.
यशोभूमीमध्ये 15 सभागृहे
दिल्लीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करण्यासाठी यशोभूमी हे मुख्य केंद्र असेल. यशोभूमीचे कन्व्हेन्शन सेंटर ७३ हजार स्क्वेअर मीटरमध्ये पसरले आहे. मुख्य सभागृह, ग्रँड बॉलरूम आणि 13 बैठक खोल्यांसह 15 अधिवेशन हॉल आहेत. मुख्य सभागृहात 6 हजार लोक एकाच वेळी बसू शकतात अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
ग्रँड बॉलरूममध्ये एकाच वेळी 2,500 लोक बसू शकतात. यामध्ये 500 लोकं बसू शकतील असा मोकळा भाग देखील आहे. आठ मजल्यांवर पसरलेल्या 13 सभागृहांची रचना विविध स्तरांच्या बैठका घेण्यासाठी करण्यात आली आहे.
यशोभूमी हे जगातील सर्वात मोठ्या प्रदर्शन हॉलपैकी एक आहे. 1.07 लाख स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेल्या या प्रदर्शन हॉलचा वापर प्रदर्शन, व्यापार मेळावा आणि व्यावसायिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी केला जाईल.
#WATCH | Visuals of ‘YashoBhoomi’ that Prime Minister Narendra Modi will dedicate to the nation at Dwarka on 17th September in Delhi. pic.twitter.com/j5D86ruHAv
— ANI (@ANI) September 16, 2023
यशोभूमीत पाण्याचा अपव्यय नाही
यशोभूमीच्या बांधकामात भारतीय संस्कृतीने प्रेरित साहित्य आणि वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. यशोभूमीत वापरल्या जाणाऱ्या पाण्यावर 100 टक्के प्रक्रिया केली जाईल. त्यानंतर या पाण्याचा पुनर्वापर केला जाईल. पावसाचे पाणी जमा करण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. छतावर सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. द्वारका सेक्टर 25 मधील नवीन मेट्रो स्टेशनच्या उद्घाटनासह, यशोभूमी दिल्ली विमानतळ मेट्रो एक्सप्रेस लाईनशी जोडली जाईल.