नवी दिल्ली – घरातल्या कामवाल्या बाईशी (housemaid)किती क्रूरपणे वागू शकतो, याचं हे एक उदाहरण आहे. ४८ वर्षांच्या बाईला एका जोडप्याने इतके मारले (beaten badly)की ती त्या मारात बेशुद्धच (unconscious)पडली. तिच्या शारिरिक क्रिया झाल्या तरी तिला त्याची शुद्ध नव्हती. या महिलेचे हात पाय तोडण्यात आले होते आणि तिचे केसही कापण्यात आले होते. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत हा प्रकार उघड झाला आहे. ही महिला प. बंगालमधील सिलिगुडीची रहिवासी असून, तिचे नाव रजनी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रजनी दिल्लीत या जोडप्याच्या घरात काम करण्यासाठी राहात होती. हे जोडपं या बदल्यात तिला महिन्याला सात हजार रुपये देत असत. या जबर मारहाणीचा प्रकार आता सिलिगुडीतील तिच्या कुटुंबाला कळवण्यात आलेला आहे.
अत्यंत गंभीर अवस्थेत रजनी १७ मे रोजी सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सूचना मिळाल्यानंतर पोलीस हॉस्पिटलमध्ये पोहचले आणि त्यांनी तिचा जबाब नोंदवला. त्यात तिने आपले मालक अभिनीत आणि त्यांच्या पत्नीने आपल्याला मारहाण केल्याची आणि केस कापल्याचा आरोप केला. पीडितेवर सध्या उपचार सुरु आहेत.
या मालक जोडप्याविरोधात मारहाण करणे, कैद करणे, जखम करणे या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आरोपींना पकडण्याचेही प्रयत्न सुरु आहेत. तिला ज्या प्लेसमेंट एजन्सीने नोकरी दिली होती, त्यांना रविवारी रात्री उशिरा या मालकाचा फोन आला होता. त्यावेळी रजनी आजारी असून तिला घरी घेऊन जाण्याची गरज सांगण्यात आली होती.
या फोननंतर या नराधम जोडप्याने, रजनीला या प्लेसमेंट एजन्सीच्या कार्यालयात सोडण्यात आले. त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आले की तिला बेदम मारहाण करण्यात आली आहे, या मारहाणीमुळे ती जागेवरुन हलूही शकत नव्हती. रविवारी या आरोपींनी रजनीला घरात खूप मारहाण केली. तिच्या सगळ्या शरिरावर जखमा असल्याचे सांगण्यात येते आहे. प्लेसमेंट एजन्सीच्या मालकाने सांगितले की रजनी आजारी नव्हती, तर या मालकांनी तिला मारहाण केली होती. तिला जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेव्हा रजनीने ते नेहमीच अशी मारहाण करत असल्याचे सांगितले. ही महिला गेल्या वर्षी सप्टेंबरपासून त्यांच्यकडे काम करीत होती. आता पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत.