Sela Tunnel | जगातल्या सर्वात मोठ्या डबल लेन भुयारी मार्गाचे उद्घाटन, सैन्य दलासाठीही असा ठरणार उपयुक्त
जगातल्या सर्वात मोठ्या दुपदरी बोगद्याचे उद्घाटन शनिवारी पंतप्रधान नरेंद्री मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. चीन सीमा प्रदेशात पायाभूत सुविधा वाढवित असल्याने भारताने देखील पूर्वोत्तर राज्यात विकास कामांचा धडाका लावला आहे. या मार्गामुळे भारतीय सेन्यांची तैनाती जलद गतीने करणे सोपे होणार आहे.
नवी दिल्ली | 10 मार्च 2024 : अरुणाचल प्रदेशातील ईटानगरातील सेला टनेलचे ( Sela Tunnel ) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. हा डबल लेनचा भुयारी मार्ग जगातील सर्वात मोठा असून त्याला बांधण्यासाठी 825 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. सेला प्रकल्पात दोन बोगदे आणि 8.780 किमीच्या रस्त्यांचा समावेश आहे. पुर्वोत्तर राज्याच्या आपल्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विकास योजनांची पायाभरणी देखील केली. यावेळी ‘विकसित भारत, विकसित नॉर्थ ईस्ट’ कार्यक्रमात पीएम मोदी यांनी संपूर्ण पूर्वोत्तर राज्यात चारपट वेगाने विकासाचे काम सुरु असल्याचे सांगितले. राज्यांच्या विकासातून देशाचा विकास सुरु असून आपल्या विकसित पूर्वोत्तर उत्सवात सहभाग घेण्याचे भाग्य मिळाल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.
हा दुपदरी भुयारी मार्ग अरुणाचल राज्याच्या पश्चिम कामेंग जिल्ह्यात बांधला आहे. हा दुहेरी ऑल सिझन बोगदा अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामिंग आणि तवांग जिल्ह्यांना जोडणार आहे. LAC ला पोहोचण्याचा हा एकमेव मार्ग आहे. या सेला बोगद्याच्या बांधकामाची घोषणा केंद्र सरकारने 2018 मध्ये केली होती. चीनच्या सीमेजवळ बांधलेला हा मार्ग बालीपारा-चारडवार-तवांग रस्त्याचा एक भाग आहे, सेला बोगदा प्रकल्पाचे बांधकाम आपल्या भारतीय सैन्य दलाच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने केले आहे.
सेला बोगदा प्रकल्पात दोन बोगदे आणि एक जोड रस्ता आहे. पहिला 1,980 मीटर लांबीचा सिंगल-ट्यूब बोगदा आहे. आणि दुसरा बोगदा 1,555 मीटर लांबीचा आहे. बोगदा-2 मध्ये वाहतुकीसाठी दोन-लेन ट्यूब आणि आणीबाणीसाठी एस्केप ट्यूब आहे. दोन बोगद्यांमधील लिंक रोड 1,200 मीटरचा आहे. सेला बोगदा, अप्रोच रोड आणि लिंक रोडसह प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे 12 किमी इतकी आहे. दोन्ही बोगदे सेलाच्या पश्चिमेला दोन शिखरांमधून आले आहेत.
सेला बोगद्याचा लष्कराला हा फायदा
सेला बोगद्यामुळे, तेजपूर ते तवांग दरम्यानच्या प्रवासाचा वेळ सुमार एक तासाने कमी होणार आहे. आणि सर्व ऋतूंमध्ये कनेक्टिव्हिटी देखील उपलब्ध होणार आहे. सध्या हिवाळा आणि जोरदार बर्फवृष्टीमुळे सेला पास हिवाळ्यातील महिने बंद ठेवावा लागत होता. सेला बोगदा लष्करी आणि नागरी दोन्ही वाहनांसाठी उपयोगी ठरणार आहे. आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) आणि तवांग सेक्टरच्या पुढील सीमाभागात शस्त्रे आणि सैन्याची जलद तैनाती केली जाऊ शकते. बोगदा तयार झाल्यानंतर वर्षातील 12 महिने हा रस्ता खुला राहणार आहे. तवांगच्या स्थानिकांची आता उर्वरित देशांपासून आपण वेगळे पडल्याची भावना नष्ट होणार आहे.