Corona : सावधान, यापुढे रेल्वेतून प्रवास करताना मास्क घालणे अनिवार्य, कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा मोठा निर्णय
रेल्वे बोर्डाने सर्व गाड्या आणि स्थानक परिसरात प्रवाशांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनाही मास्क घालण्यास सांगण्यात आले आहे. तर याबाबत जनजागृती मोहीमही राबविण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : कोरोनाचा (Corona) धोका अद्याप संपलेला नाही. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाबाधीतांचा आलेख हा झपाट्याने वाढत आहे. राजधानी दिल्लीसह काही राज्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. मात्र, वाढत्या कोरोना बाधीतांचा पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून (Central and State Governments) सातत्याने कठोर पावले उचलली जात आहेत. तर निर्बंधही पुन्हा लादण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, भारतीय रेल्वेनेही एक मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांतर्गत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला असून, आता रेल्वे प्रवासादरम्यान मास्क घालणे अनिवार्य करण्यात आला आहे. रेल्वे प्रवासादरम्यान कोरोनाच्या प्रोटोकॉलचे पुनरागमन होत आहे. कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता, रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांना मास्क (Masks) घालणे पुन्हा अनिवार्य केले आहे.
रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक (प्रवासी) नीरज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व झोनच्या मुख्य व्यवस्थापकांना पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. या अंतर्गत रेल्वेमध्ये प्रवास करताना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आल्याचे पत्रात लिहिले आहे. तसेच मास्क न लावणाऱ्यांवर तर कोरोना प्रोटोकॉलचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत, सर्व प्रवाशांनी रेल्वे प्रवासादरम्यान मास्क घालणे आवश्यक आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास दंड भरावा लागेल
भारतीय रेल्वेनुसार, केंद्रीय गृह मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने 22 मार्च रोजी कोविड संदर्भात जारी केलेल्या SOP चे पालन केले जात आहे. यासोबतच मास्कशिवाय प्रवास करताना कोणी प्रवाशी आढळून आल्यास अशा प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तर सध्या लोकांना मास्क घालण्यास सांगण्यात आले आहे.
रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही बंधनकारक
रेल्वे बोर्डाने सर्व गाड्या आणि स्थानक परिसरात प्रवाशांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनाही मास्क घालण्यास सांगण्यात आले आहे. तर याबाबत जनजागृती मोहीमही राबविण्यात येणार आहे. दरम्यान कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर रेल्वेने इतर निर्बंध हटवण्यासोबत मास्कची सक्तीही दूर केली होती. तसेच प्रवासादरम्यान पूर्वीप्रमाणेच पॅन्ट्री, उशी आणि चादर देखील देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता पुन्हा एकदा देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे रेल्वेही निर्बंध वाढवत आहे.