देशात झपाट्याने पसरतोय कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट, या राज्यात सर्वाधिक संक्रमित
covid 19 : देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ कायम आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. हाच व्हेरिएंट भारतात दहा राज्यांमध्ये आढळला आहे. त्यामुळे चिंता वाढत आहेत. कोरोनाच्या या प्रसारावर प्रशासन लक्ष ठेवून आहे. पण तरी देखील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा चिंतेचं कारण बनला आहे.
Corona update : कोरोना JN.1 व्हेरिएंट झपाट्याने वाढत आहे. भारतासह अनेक देशांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 573 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशात सक्रिय रुग्णांची संख्या 4,565 वर पोहोचली आहे. भारतीय SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) ने मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोविड-19 च्या नवीन प्रकार JN.1 ची एकूण 263 प्रकरणे देशात आतापर्यंत नोंदवली गेली आहेत, त्यापैकी जवळपास निम्मी केरळमध्ये आढळली आहेत.
10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये JN.1 व्हेरिएंटचे रुग्ण
भारतात आतापर्यंत 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये JN.1 व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. INSACOG नुसार, केरळ (133), गोवा (51), गुजरात (34), दिल्ली (16), कर्नाटक (8), महाराष्ट्र (9), राजस्थान (5), तामिळनाडू (4), तेलंगणा (4), ओडिशा (1) या राज्यांच्या यात समावेश आहे. डिसेंबरमध्ये नव्या व्हेरिएंटची 239 प्रकरणे आढळली आहे. नोव्हेंबरमध्ये 24 प्रकरणे आढळली होती.
अनेक देशांमध्ये JN.1 चा संसर्ग वाढला
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) JN.1 चे त्याच्या जलद जागतिक प्रसारानंतर परीक्षण करण्यासाठी एक प्रकार म्हणून वर्गीकरण केले आहे, परंतु JN.1 मुळे होणाऱ्या अतिरिक्त सार्वजनिक आरोग्य जोखमींबाबत मर्यादित उपलब्ध पुरावे देखील विचारात घेतले आहेत. सध्या जागतिक स्तरावर आरोग्य धोके कमी लेखले जात आहेत.
अलिकडच्या आठवड्यात, JN.1 ची प्रकरणे अनेक देशांमधून सातत्याने नोंदवली जात आहेत. देशात कोविड-19 प्रकरणांची वाढती संख्या आणि JN.1 प्रकार आढळून येत असताना केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतत जागरुक राहण्यास सांगितले आहे.