माकडाने पुडी फेकली, मुलांनी साखर पावडर म्हणून खाल्ले, पण ते निघाले…
उत्तर प्रदेशातील बदाऊन येथून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील बागराण गावात गुड्डू अली यांचे घर आहे. तीन मुले खेळत असताना त्यांच्या हाताला ती पुडी लागली. माकडाने फेकलेल्या त्या पुडीची त्यांनी तपासणी केली. त्यावेळी पोलिसांना त्या पुडीत...
उत्तर प्रदेश | 20 नोव्हेंबर 2023 : घराजवळ असणाऱ्या शेतात वन्य प्राणी येणे हे काही आता नवीन नाही. शेतातील पिकाचा फडशा पडण्यासाठी माकडे, डुक्कर, हत्ती, कोल्हा हे धुमाकूळ घालत असतात. कितीही उपाय केले तरी हे वन्यप्राणी शेतातील पिकाचे नुकसान करतातच. हे वन्यप्राणी इतर ठिकाणाहून आणलेले धान्य, वस्तू, खाद्यपदार्थ खाऊन झाल्यानंतर फेकून देतात. उत्तर प्रदेशमध्ये अशाच एका माकडाने एक करामत केली. मात्र त्याची ही करामतमुळे तीन लहानग्या मुलांच्या जीवावर बेतली आहे. उत्तर प्रदेशातील बदाऊन येथून ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील बागराण गावात गुड्डू अली यांचे घर आहे. त्यांची दोन लहान मुले आतिफ अली (५) आणि राहत अली (४) हे आपल्या घराजवळ खेळत होते. त्यांच्याशेजारी राहणारी तहसीम यांची मुलगी मन्नत (५) ही सुद्धा त्यांच्यासोबत खेळायला आली. हे तिघे खेळत असताना झाडावर बसलेल्या एका माकडाने एक पुडी फेकली.
ती तीन मुले खेळत असताना त्यांच्या हाताला ती पुडी लागली. त्या पुडीतील पिठी साखरेसारखा दिसणारा तो पदार्थ त्या मुलांनी खाल्ला. तो पदार्थ खाल्ल्यानंतर काही वेळाने तिन्ही मुलांची प्रकृती ढासळू लागली. त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला. त्या मुलांच्या कुटुंबीयांनी तत्काळ मुलांना घेऊन रुग्णालयात धाव घेतली.
त्या मुलांना रुग्णालयात पोहोचेपर्यंत फार उशीर झाला. रुग्णालयातील डॉक्टरांनी आतिफ याला मृत घोषित केले. तर राहत याची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर, मन्नत हिच्या प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या तीन मुलांपैकी दोघे सख्खे भाऊ आहेत.
सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी अधिक तपास केला. माकडाने फेकलेल्या त्या पुडीची त्यांनी तपासणी केली. त्यावेळी पोलिसांना त्या पुडीत विष असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ती पुडी आपल्या ताब्यात घेतली आहे. माकडाने कुठून तरी आणलेल्या विषारी पदार्थाची ही पुडी होती. त्याच पुडीतील पदार्थ खाल्ल्यामुळे या मुलांना विषबाधा झाली अशी माहिती पोलिसांनी दिली. दोण लहान मुलांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत असेही त्यांनी सांगितले.