RBI News on 2000 Note : दुसऱ्या नोटबंदीची तारीख खरंच अगोदरच होती निश्चित? मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाराजीचे कारण तरी काय
RBI News on 2000 Note : दुसऱ्या नोटबंदीवरुन राजकारण पुन्हा पेटले आहे. विरोधक आणि समर्थक नोटबंदीवरुन खरीखोटी सुनावत असतानाच या 2000 रुपयांच्या नोटेची ही इनसाईट स्टोरी अख्ख चित्रच पालटून टाकेल हे मात्र नक्की...
नवी दिल्ली : नोटबंदी 2.0 वरुन देशभरात राजकारण पेटले आहे. विरोधकांना केंद्र सरकारवर तोंडसुख घ्यायला आयते कोलीत गवसलं आहे. विरोधी गोटातील सर्वच दिग्गज नेते केंद्र सरकार, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) या निर्णयावर तोफ डागत आहेत. अवघ्या 7 वर्षांतच मोदी सरकारला (Modi Government) त्यांनीच बाजारात आणलेली गुलाबी नोट (2000 Rupees Note) माघारी घ्यावी लागलेल्याने बोचरी टीका होत आहे. 2016 साली नोटबंदी झाली होती. त्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या पंतप्रधानाच्या जवळच्याच व्यक्तीने एक गौप्यस्फोट केला आहे.
पूर्व प्रधान सचिवांचा दावा काय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पूर्व प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्या दाव्याने सध्या खळबळ उडाली आहे. दोन हजारांची नोट माघारी बोलावल्याने पंतप्रधान सध्या विरोधकांच्या रोषाचे धनी झाले आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात काय सुरु होते. ही गुलाबी नोट बाजारात आणण्याविषयी त्यांचे मत काय होते, याची माहिती आता समोर आली आहे. 2000 रुपयांच्या नोटेची ही इनसाईट स्टोरी अख्ख चित्रच पालटून टाकेल हे मात्र नक्की…
धक्कादायक खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पूर्व प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी खळबळजनक दावा केला आहे. 2016 मध्ये नोटबंदीचा निर्णय झाला. त्याअगोदरच दोन हजारांच्या नोटेची छपाई सुरु करण्यात आली होती. पण पंतप्रधान 2000 रुपयांची नोट बाजारात आणण्याच्या बाजूने बिलकूल नव्हते. पण त्यांनी टीमचा सल्ला ग्राह्य धरला. पंतप्रधानांच्या टीमने ही नोट तात्पुरती बाजारात आणण्याचे धोरण स्वीकारले होते. दोन हजारांची नोट बंदीच्या एक दिवसानंतर त्यांनी News18 सोबत बोलताना हा खुलासा केला.
काय म्हणाले मिश्र मिश्रा यांच्या मते, 2000 रुपयांची नोट माघारी घेण्यात आली आहे. याला तुम्ही नोटबंदी म्हणू शकत नाही. ही एक तात्पुरती व्यवस्था होती. अगदी काही कालावधीसाठी, नोटबंदीनंतर नागरिकांना विनिमय करता यावा यासाठीची व्यवस्था करण्यात आली होती.
तारीख अगोदरच निश्चित तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर दोन हजार रुपयांची नोट बाजारात आणण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. 2000 रुपयांची नोट बाजारात आणण्याची ही कल्पना मोदी यांना पसंत पडली नाही. पण कॅप्टन म्हणून त्यांनी टीमच्या या प्रस्तावाला मंजुरी दिली. दोन हजारांची नोट बाजारात आणण्याची व्यवस्था अल्पकालीन असेल याविषयी मोदी अत्यंत स्पष्ट होते, असे मिश्रा यांनी सांगितले. म्हणजेच दोन हजारांची नोट फार काळ चलनात ठेवायची नाही, हे त्याचवेळी ठरविण्यात आले होते.
काळ्या पैशांची चिंता ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, ते जास्त मूल्य असलेल्या नोटांचा साठा करतात. त्यामुळेच ही नोट प्रदीर्घ काळ चलनात ठेवणे फायद्याचे नव्हते, असे नृपेंद्र मिश्रा यांनी स्पष्ट केले. यावेळी दोन हजार रुपयांची नोट बदलण्यात नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही, ही प्रक्रिया सुटसूटीत आणि सोपी असल्याचा दावा मिश्रा यांनी केला.