मोठा धमाका होणार आहे, भाजप नेत्याच्या वक्तव्याने बिहारच्या राजकारणात खळबळ
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपसोबत हातमिळवणी करणार आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधीच इंडिया आघाडीला हा तिसरा झटका लागणार आहे.
Bihar Politics : देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीला मोठा धक्का बसू शकतो. भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रभाकर मिश्रा यांनी गुरुवारी यांनी बोलताना राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू यादव आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा समाचार घेतला. मोठा भाऊ आणि धाकटा भाऊ यांच्यात दबावाचे राजकारण सुरू असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे लवकरच महाआघाडीत मोठा धमाका होणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे.
नितीश कुमार यांची लालू यादव यांच्यावर टीका
जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात लालू यादव यांच्यावर नितीश कुमार यांनी टीका केली होती. घराणेशाहीच्या मुद्द्यावर ही टीका करण्यात आली होती.
नितीश कुमार यांना भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीत पुन्हा यायचं असल्याचं बोललं जात होतं. याबाबत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यात चर्चा झाली असून हिरवा कंदील दिल्याचंं देखील म्हटले जात आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. बिहारच्या राजकारणात सत्ता परिवर्तनाची शक्यता आहे. सम्राट चौधरी यांना गुरुवारी पक्ष नेतृत्वाने अचानक दिल्लीत बोलावले. सम्राट यांच्यासह बिहार भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते विजय सिन्हा, प्रदेश संघटन सरचिटणीस नागेंद्र नाथ, राज्य संघटनेचे महासचिव भिखू भाई दलसानिया यांनाही दिल्लीत बोलावले गेले होते.
बिहारचे नेते दिल्लीत दाखल
माजी उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनाही केंद्रीय नेतृत्वाने दिल्ली गाठण्याच्या सूचना दिल्या होत्या. बिहार भाजपचे प्रभारी आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या निवासस्थानी सर्व नेते एकत्र आले.
केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्याशिवाय राज्यसभा सदस्य सुशील मोदी यांनाही बोलावल्याची चर्चा होती. प्रदेशाध्यक्ष तसेच विधीमंडळ पक्षनेते आणि अनेक ज्येष्ठ नेत्यांना अचानक बोलावण्यात आल्याने राज्यात राजकीय चर्चा शिगेला पोहोचली आहे.
नव्या सरकारचा फॉर्म्युला काय?
बिहारमध्ये भाजपचे दोन उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. नितीश कुमार हेच मुख्यमंत्री राहणार असून भाजपचे दोन उपमुख्यमंत्री होणार आहेत. राज्यात पुन्हा एकदा जनता दल युनायटेड आणि भाजपचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात सरकारचा शपथविधी होऊ शकतो. अशी ही शक्यता आहे.