विनातिकीट प्रवास करणाऱ्यांनो सावधान, रेल्वेच्या या दोन टीसींनी वसुल केला एक-एक कोटीचा दंड
विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेच्या टीसींनी कोट्यवधींचा दंड वसुल केला आहे.
मुंबई : रेल्वे प्रशासन अनेकदा आवाहन करीत असते तिकीट काढून सन्मानाने प्रवास करा. तरीही अनेक जण विनातिकीट बिनधास्त प्रवास करीत असतात. त्यामुळे अशा प्रवाशांवर रेल्वे प्रशासन मोहिम राबवून वेळोवेळी कारवाई करीत असते. रेल्वेच्या विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधातील धडक मोहिमेमुळे रेल्वेच्या तिजोरीत दंडाच्या रूपात कोट्यवधी रूपयांची भर पडत असते. अशात पश्चिम रेल्वेच्या दोघा टीसींनी फुकट्या प्रवाशांकडून एकेक कोटी रूपयांचा दंड वसुल करीत अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे.
उपनगरीय लोकल आणि लांबपल्ल्याच्या ट्रेनमध्ये रेल्वे आरपीएफ आणि टीसींच्या विविध पथकांमार्फत मोहीमा राबवित असते. अशात पश्चिम रेल्वेच्या राजकोट डीविजन आणि फ्लाईंग स्क्वाडचे दोघा तिकीट तपासनीसांनी कमालच केली आहे. राजकोट डीविजनचे उप मुख्य तिकीट निरीक्षक (Dy. CTI) के. डी. ओझा आणि चर्चगेटच्या फ्लाइंग स्क्वाडचे उप मुख्य टिकट निरीक्षक जाहिद कुरैशी यांनी विनातिकीट प्रवाशांना कडून प्रत्येकी एक कोटीहून अधिक रूपयांचा दंड वसुल करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकुर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार राजकोट डीविजनचे उप मुख्य टिकट निरीक्षक के. डी. ओझा यांनी चालू वित्त वर्ष 2022-23 मध्ये फेब्रुवारी 2023 पर्यंत एकूण 14,928 प्रकरणात 1.13 कोटी रुपयांचा दंड वसुल केला आहे. तर चर्चगेटच्या फ्लाईंग स्क्वाडमध्ये कार्यरत उप मुख्य तिकीट निरीक्षक जाहिद कुरैशी यांनीही विनातिकीट प्रवाशांकडून जानेवारी ते डिसेंबर 2022 पर्यंत दाखल 13,116 प्रकरणात 1.06 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. अहमदाबाद डीविजनचे वरिष्ठ तिकीट परीक्षक (Sr. TE) अजमेर सिंह यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत 17,806 प्रकरणात 93.47 लाख रुपयांचा दंड वसुल केला आहे.
एकूण 158.28 कोटी रुपये दंड
पश्चिम रेल्वेच्या महिला तिकीट चेकिंग स्टाफही यात मागे नाहीत, अहमदाबाद विभागाच्या उप मुख्य तिकीट निरीक्षक शैल तिवारी यांनी फेब्रुवारी 2023 पर्यंत 7,293 प्रकरणात 54.70 लाख रुपयांचा दंड वसुल केला आहे. चर्चगेटच्या फ्लाईंग स्क्वाडमध्ये कार्यरत मुख्य तिकीट निरीक्षक गीताबेन वसावा यांनी 7,085 प्रकरणातून 51.19 लाख रुपयांचा दंड वसुल केला आहे. पश्चिम रेल्वेने एप्रिल, 2022 ते फेब्रुवारी 2023 काळात विनातिकीट प्रवास आणि बेकायदेशीर सामान प्रकरणात एकूण 23.70 लाख केस दाखल करीत 158.28 कोटी रुपये दंड जमा केला असून तो गेल्यावर्षी याचे काळात वसुल केलेल्या दंडापेक्षा 68.01% अधिक आहे.