शपथविधी सोहळा पाहायला आले आणि थेट मंत्री झाले, या नेत्याला अशी लागली लॉटरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला आहे. मोदींसह ७१ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पण या मंत्रिमंडळात असे देखील एक नेते आहे ज्यांना ते मंत्री होणार याची कल्पना देखील नव्हती. कोण आहेत ते नेते जाणून घ्या
लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमताचा आकडा गाठता आलेला नसला तरी मित्रपक्षाच्या मदतीने एनडीएने बहुमत मिळवले आहे. टीडीपी, शिवसेना, जेडीयू आणि इतर छोट्या पक्षांच्या मदतीने नरेंद्र मोदी यांनी सत्ता स्थापन केली आहे. मोदी सरकार 03 ची मंत्रिमंडळाचे खाते वाटप ही जाहीर झाले आहे. पण एनडीए सरकारमध्ये एकाही मुस्लीम नेत्याला स्थान मिळालेले नाही. पंतप्रधान मोदी यांच्यासह एकूण ७२ मंत्र्यांनी शपथ घेतली. ज्यामध्ये पाच अल्पसंख्याक समुदायातील मंत्र्यांचा देखील समावेश आहे. यामधलं एक नाव म्हणजे जॉर्ज कुरियन. शपथविधीच्या सोहळा पाहण्यासाठी ते आले होते आणि थेट त्यांना मंत्रिपदाची शपथ घेण्याच्या सूचना आल्या.
थेट मंत्रिमंडळात स्थान
ना लोकसभेचे सदस्य ना राज्यसभेचे सदस्य तरी देखील मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले आहे. आता ते अल्पसंख्याक कल्याण राज्यमंत्री झाले आहेत. जॉर्ज कुरियन हे मूळचे केरळचे राहणार असून ते ख्रिश्चन समाजाचे आहेत. त्यांना मंत्रीपद दिल्याने ख्रश्चन समाजाला आपल्याकडे आकर्षित करता येईल अशी भाजपी रणनीती आहे. केरळमध्ये हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन या तिन्ही समुदायांची लोकसंख्या चांगली आहे.
ख्रिश्चन लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
भाजपला सामान्यतः हिंदूंंचा मोठा पाठिंबा मिळतो. काँग्रेसला मुस्लीम समजाचा चांगला पाठिंबा मिळतो. तर ख्रिश्चन धर्माचे लोक हे शक्यतो डाव्या विचारसरणीचे असतात. जॉर्ज कुरियन यांना ज्या पद्धतीने मंत्रिपद देण्यात आले त्याबद्दल अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत. जॉर्ज कुरियन यांना मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं जेव्हा कळलं तेव्हा त्यांना देखील याचे आश्चर्य वाटले. जॉर्ज कुरियन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी ते दिल्लीत आले होते. पण त्यांना मंत्री केलं जाणार याची कोणतीही माहिती त्यांना नव्हती.
एकनिष्ठ राहिल्याचे फळ
मंत्रिपदाची शपथ घ्यायची असल्याची जेव्हा त्यांना सूचना आली तेव्हा त्यांना देखील यावर विश्वास बसत नव्हता. कारण ते संसदेचे सदस्य नाहीत. त्यांना याची कोणतीही कल्पना नव्हती. केरळमध्ये ख्रिश्चन समाजातील अनेक नेते आता भाजपमध्ये दाखल झाले आहेत. तरीही कुरियन यांच्यावर पक्षाने अधिक विश्वास दाखवला. कारण ते अनेक दशकांपासून भाजपशी एकनिष्ठ राहिलेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेपासून ते काम करत आहेत. त्यामुळे त्यांना संधी देणे हेही निष्ठेचे बक्षीस आहे. ख्रिश्चन समुदायातून स्वतःच्या विचारसरणीत वाढलेला नेता तयार करायचा आहे.
सायरो-मलबार कॅथोलिक चर्चशी संबंधित जॉर्ज कुरियन केरळमध्ये खूप सक्रिय नेते आहेत. राज्यातील ख्रिश्चन समाजातील लोकांमध्ये भाजपचा आवाका वाढावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. ते म्हणाले की, मला अल्पसंख्याक मंत्रालयाची जबाबदारी मिळाली आहे, त्यात मी पूर्ण गांभीर्याने काम करेन. मी माझ्या समाजासह संपूर्ण अल्पसंख्याक समाजाच्या हितासाठी काम करेन. त्यांच्याकडे पशुसंवर्धन खात्याच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारीही आली आहे.