Jammu Kashmir: ड्रोन पाठवून आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन केल्याबद्दल भारताने पाकिस्तानकडे नोंदवला निषेध
दरम्यान, जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमधील रामबाग भागात बुधवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी ही माहिती दिली. ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एक, टीआरएफ कमांडर मेहरान यासीन होता.
नवी दिल्लीः सीमेवर ड्रोन पाठवून आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन केल्याबद्दल बीएसएफच्या (Border Security Force) शिष्टमंडळाने बुधवारी पाकिस्तानकडे तीव्र निषेध नोंदविला आणि अशा कारवायांपासून दूर राहण्यास सांगितले. बीएसएफच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, जकात चौकीवर पाकिस्तानी रेंजर्ससोबत कमांडंट स्तरावरील बैठकीदरम्यान हा निषेध नोंदवण्यात आला. बैठकीदरम्यान, दोन्ही सीमा सुरक्षा दलांच्या कमांडर्सनी सीमेवरील खांबांची देखभाल आणि सीमेवरील पायाभूत सुविधा, पाकिस्तानकडून ड्रोन ऑपरेशन्स आणि इतर विविध मुद्द्यांवर चर्चा केली गेली. सीमेवर शांततापूर्ण वातावरण राखण्यासाठी पावलं उचलण्यासाठी दोन्ही कमांडर सहमत असल्याचं प्रवक्त्यांनी सांगितले. बीएसएफच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व कमांडंट अजय सूर्यवंशी आणि पाकिस्तानी शिष्टमंडळाचे नेतृत्व 13 विंग चिनाब रेंजर्सचे विंग कमांडर लेफ्टनंट कर्नल अकील यांनी केले.
चकमकीत तीन दहशतवादी ठार
दरम्यान, जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमधील रामबाग भागात बुधवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी ही माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील लाल चौक-विमानतळ मार्गावरील रामबाग पुलाजवळ झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. कमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एक, टीआरएफ कमांडर मेहरान यासीन हा श्रीनगरमध्ये शाळेचे मुख्याध्यापक सुपिंदर कौर आणि शिक्षक दीपक चंद यांच्या हत्येत सामील होता. ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांची ओळख- TRF कमांडर मेहरान यासीन शल्ला, मंजूर अहमद मीर आणि अराफत अहमद शेख, अशी आहे. ही माहिती काश्मीर पोलीसांनी दिली.
One of the three terrorists killed in the encounter in Srinagar’s Rambagh has been identified as Mehran, a top TRF commander who was involved in killing of two teachers & other civilians in the city. Identification of others is being ascertained: Kashmir IG Vijay Kumar to ANI pic.twitter.com/ZY9A19uMTu
— ANI (@ANI) November 24, 2021
दोन दिवस आधी, राष्ट्रीय तपास संस्थेने टेरर फंडिंग प्रकरणी श्रीनगरमधील मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या कार्यालयांसह अनेक ठिकाणी छापे टाकले होते. एनआयएने आपल्या विधानांमध्ये वारंवार दावा केला आहे की वेगवेगळ्या संस्थांना अज्ञात देणगीदारांकडून निधी मिळत होता, ज्याचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जात आहे.
पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी करण्यासाठी नवीन योजना तयार केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळत आहे. या अंतर्गत पाकिस्तान पाण्यातून दहशतवाद्यांना पाठवू शकतो आणि त्यावर त्यांनी काम सुरू केले आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. पाकिस्तान त्यांच्या स्पेशल फोर्ससाठी अनेक परदेशी कंपन्यांकडून पाण्याखाली चालणाऱ्या लहान क्राफ्ट खरेदी करत असल्याचं सांगण्यात येत आहे.
इतर बातम्या