ममता बॅनर्जी यांचा इंडिया आघाडीला मोठा झटका, बंगालमध्ये मोठी राजकीय खेळी
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला न जुमानता लोकसभेच्या निवडणुकीसाठी तब्बल 42 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आता इंडिया आघाडीचे नेते काय भूमिका मांडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
संदीप राजगोळकर, Tv9 मराठी, कोलकाता | 10 मार्च 2024 : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये ‘एकला चलो’चा नारा दिला आहे. ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 42 जागांचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीचं टेन्शन वाढलं आहे. इंडिया आघाडीत देशभरातील विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. ममता बॅनर्जी या देखील या आघाडीत सहभागी झाल्या होत्या. पण जागावाटपावर एकमत न झाल्याने कदाचित ममता बॅनर्जी या स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष हा बंगालमधला सर्वात मोठा पक्ष आहेत. त्यांच्या पक्षाची बंगालमध्ये ताकद आहे. असं असलं तरी मित्र धर्माचं पालन करुन ममता बॅनर्जी या काँग्रेसला सोबत घेऊन तरी निवडणूक लढतील, असा अंदाज वर्तवला जात होता. तसेच बंगालमध्ये डाव्या पक्षांसोबतही त्या मैत्री करतील, असा अंदाज वर्तवला जात होता. या सर्व अंदाजांच्या पुढे जावून ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला न जुमानत लोकसभेच्या 42 जागांचे उमेदवार जाहीर केले आहेत.
येत्या काळत इंडिया आघाडीसोबत एकमत झाल्यानंतर ममता बॅनर्जी आपले काही उमेदवार मागे घेतात का? ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. पण ममता यांनी इंडिया आघाडीसोबत कोणतीही चर्चा न करता 42 उमेदवारांची घोषणा केल्याने लोकसभा निवडणूक ही किती रंजक होणार, याचे संकेत दिले आहेत. आता बंगालमध्ये भाजप काय राजकीय खेळी खेळणार? ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ममता बॅनर्जी यांना बंगालमध्ये भाजपचं कडवं आव्हान असण्याची शक्यता आहे. कारण भाजपकडून कोणत्याही प्रयत्नात बंगालमध्ये यश मिळवायचं आहे. या संघर्षात ममता बॅनर्जी यांना इंडिया आघाडीचा पाठिंबा मिळतो का किंवा तो पाठिंबा मिळून घेण्यात ममता यशस्वी होतात का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
काँग्रेसच्या दिग्गज नेत्याविरोधात युफूस पठाणला उमेदवारी
ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलेल्या 42 उमेदवारांच्या यादीत क्रिकेट जगतातील एका दिग्गजाचं नाव आहे. टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू युसूफ पठाण याला तृणमूल काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. युसूफ पठाणला बहरामपूर मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट मिळालं आहे. याच मतदारसंघात काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी निवडणूक लढवण्यची शक्यता आहे. अधीर रंजन चौधरी हे सध्या तिथले विद्यमान खासदार आहेत. तृणमूल काँग्रेसने यावेळी अभिनेत्री नुसरत जहांचं तिकीट कापलं आहे. तिच्या ऐवजी हाजी नुरुल इस्लाम यांना बशीरहाट लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.