संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला आज 22 वर्ष पूर्ण होत असताना पुन्हा एकदा धक्कादायक घटना
security breach in lok sabha : लोकसभेत आज धक्कादायक घटना घडली आहे. संसदेच्या सुरक्षेतील त्रुटी अशा वेळी समोर आली आहे जेव्हा या दिवशी म्हणजे १३ डिसेंबर २००१ रोजी संसद भवनावर दहशतवादी हल्ला झाला होता. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. संसदेची सुरक्षा आता आणखी वाढवण्यात आली आहे.
नवी दिल्ली : संसद भवनाच्या सुरक्षेत आज दोन चुका झाल्या आहेत. पहिल्यांदाच संसद भवनाबाहेर आंदोलन करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर काही वेळातच लोकसभेच्या कामकाजादरम्यान दोन तरुणांनी सुरक्षा कठडा तोडून सभागृहात प्रवेश केला. दोन्ही प्रेक्षकांनी गॅलरीतून उड्या मारल्या होत्या. सभागृहात सर्वत्र धूर पसरवला होता. या घटनेने लोकसभेत खळबळ उडाली. लोकसभेचे कामकाज पुन्हा एकदा सुरु झाली आहे. संसदेची सुरक्षा आणखी वाढण्यात आली आहे.
दहशतवादी हल्ल्याला आजच २२ वर्षे पूर्ण
या घटनेने 22 वर्षे जुन्या दहशतवादी घटनेची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे. जेव्हा 13 डिसेंबर 2001 रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय संसदेच्या संकुलावर हल्ला केला होता आणि ज्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. या दहशतवादी हल्ल्यात अनेक दिल्ली पोलिसांचे कर्मचाऱ्यांसह ९ जण शहीद झाले होते. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी पाचही दहशतवाद्यांना ठार केले.
याशिवाय काही दिवसांपूर्वी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने संसद भवनावर हल्ला करण्याची धमकी दिली होती. अशा परिस्थितीत संसदेची सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडेकोट होती.
मात्र तरीही दोन आंदोलक संसदेबाहेर पोहोचले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्याच्या हातात अश्रुधुराची डबी होती. मात्र, काही वेळातच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यामध्ये एक पुरुष आणि एक स्त्री होती. मात्र, काही वेळानंतर पुन्हा सुरक्षेमध्ये गडबड झाली.
#WATCH | Delhi: Two protestors, a man and a woman have been detained by Police in front of Transport Bhawan who were protesting with colour smoke. The incident took place outside the Parliament: Delhi Police pic.twitter.com/EZAdULMliz
— ANI (@ANI) December 13, 2023
खासदारांमध्ये एकच खळबळ
यावेळी दोन तरुणांनी लोकसभेत प्रवेश केला. ज्यांना पाहून सभागृहात उपस्थित खासदारांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती देताना काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले – दोन तरुणांनी गॅलरीतून उडी मारली आणि त्यांनी काहीतरी फेकले ज्यामुळे गॅस बाहेर पडत होता. त्याला खासदारांनी पकडले आणि यानंतर सुरक्षा कर्मचारी त्यांना बाहेर घेऊन गेले.