टोमॅटोचे भाव गगणाला भिडणार, पेट्रोलचे रेकॉर्ड ही मोडणार
भाजीमध्ये टाकला जाणारा महत्त्वाचा घटक म्हणजे टोमॅटो. पण हा टोमॅटो आता पुढच्या काही दिवसात तुमच्या किचनचे बजेट बिघडवणार आहे. कारण टोमॅटोचे दर गगणाला भिडले आहेत. येत्या काही दिवसात ते २०० रुपयापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : यंदाही टोमॅटोचे दर 200 रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. देशातील अनेक भागात पाऊस आणि पुरामुळे टोमॅटोसह अनेक भाज्यांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळेच टोमॅटोबरोबरच बटाटे आणि कांदे यांचेही दर वाढले आहे. टोमॅटो ही प्रत्येक भाजीत वापरला जाणारा महत्त्वाचा घटक आहे. टोमॅटोचे दर वाढल्याने किचनचे बजेट बिघडले आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मोठ्या शहरांमध्ये टोमॅटोचे भाव 150 रुपये प्रति किलो झाले आहे. दिल्लीत 120 रुपये, चेन्नईमध्ये 117 रुपये आणि मुंबईत 108 रुपये किलोने टोमॅटो विकला जात आहे. बाजारात बटाटे 35 ते 40 रुपये किलो तर काही ठिकाणी कांदा 45 ते 50 रुपये किलो आहे.
किरकोळ बाजारात टोमॅटोचा सरासरी भाव गुरुवारी 95.58 रुपये प्रति किलो होता. देशातील चार मोठ्या शहरांव्यतिरिक्त इतर शहरांमध्येही टोमॅटोचे भाव वाढले आहेत. टोमॅटोचा किरकोळ भाव गुरुग्राममध्ये 140 रुपये प्रति किलो, बंगळुरूमध्ये 110 रुपये प्रति किलो, वाराणसीमध्ये 107 रुपये प्रति किलो, हैदराबादमध्ये 98 रुपये प्रति किलो आणि भोपाळमध्ये 90 रुपये प्रति किलो होता.
एका महिन्यात किमती 158 टक्क्यांनी वाढल्या
ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 3 जुलै रोजी टोमॅटोची सरासरी किंमत 55.04 रुपये प्रति किलो होती, जी 3 जून रोजी 34.73 रुपये प्रति किलो होती. गेल्या वर्षी 3 जुलै रोजी टोमॅटोचा भाव 67.57 रुपये किलो होता. जुलैच्या अखेरीस टोमॅटोचा भाव 67.57 रुपये प्रति किलो होता आणि ऑगस्ट 2023 च्या पहिल्या आठवड्यात तो 250 रुपये प्रति किलोपर्यंत वाढला.
टोमॅटो पेट्रोलपेक्षा दुप्पट महाग होऊ शकतो
बाजारात टोमॅटोचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या त्याचा महाग होण्याचा दर १५८ टक्के आहे. पाऊस आणि पूर, घटलेले उत्पादन आणि पुरवठ्यात होणारा अडथळा यामुळे पुढच्या महिन्यात टोमॅटोचे भाव गगणाला भिडू शकतात. टोमॅटोचे दर २०० रुपये झाला तर पेट्रोलच्या सध्याच्या किमतीच्या दुप्पट दराने तो विकला जाऊ शकतो. कारण देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या जवळ आहे.
गेल्या वर्षी देखील टोमॅटोच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली होती. दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरियाणा, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये टोमॅटोच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. अवकाळी आणि इतर पिके घेतल्याने टोमॅटोचा पुरवठा अचानक कमी झाला होता. त्यामुळे जुलैअखेरीस 20 रुपये किलो मिळणारे टोमॅटो 200 रुपये किलोपर्यंत वाढले होते. त्यावेळी केंद्र सरकारने आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये टोमॅटो खरेदी करण्याच्या सूचना आपल्या एजन्सींना दिल्या होत्या. यंदाही टोमॅटोचे भाव नियंत्रणाबाहेर जाऊ लागले तर सरकारही असेच काही करू शकते.