Tripura Elections : त्रिपुरात गुलाल कुणाचा? मतदान सुरू, पंतप्रधानांचं आवाहन काय?; काय आहे नवा ट्विस्ट?
त्रिपुरा जिंकण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद लावली आहे. पण भाजपचं सत्तेतील पुनरागमन कठिण असल्याचं दिसत आहे. राज्यातील बदलत्या समीकरणामुळे भाजपची सत्तेत येण्याची वाट बिकट झाली आहे.
आगरतळा: त्रिपुरा विधानसभेसाठी मतदान सुरू झालं आहे. राज्यातील एकूण 60 जागांसाठी मतदान करण्यात येत आहे. या निवडणुकीत एकूण 259 उमेदवार उभे राहिले आहेत. दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. या निवडणुकीत 13.53 लाख महिलासह एकूण 28.13 लाख मतदार मतदान करणार असून उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. त्रिपुरात पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकदपणाला लावली आहे. तर, काँग्रेसनेही त्रिपुरात तोडीस तोड प्रचार केला आहे. त्यामुळे विधानसभेच्या विजयाचा गुलाल कुणाच्या माथी लागणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
राज्यातील 60 जागांवर मतदान सुरू झालं आहे. राज्यातील एकूण 3337 मतदान केंद्रावर हे मतदान केलं जात आहे. यापैकी 1100 मतदान केंद्र संवेदशनशील आणि 28 मतदान केंद्रे अति संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. या निवडणुकीचे निकाल येत्या 2 मार्च रोजी जाहीर होणार आहे.
मतदार आजारी, रुग्णालयात दाखल
त्रिपुरात मतदान सुरू झाल्यानंतर मतदानासाठी रांग लागली आहे. एक मतदार रांगेत उभा होता. महारानी तुलसुबती गर्ल्स हायस्कूल येथील मतदान केंद्रावर तो रांगेत उभा होता. मात्र, अचानक त्याची तब्येत बिघडली. त्यामुळे त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मोदींचं आव्हान
त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी सकाळीच ट्विट करून त्रिपुरातील जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. त्रिपुरातील लोकांनी रेकॉर्ड संख्येने मतदान करावं. लोकशाहीचा उत्सव मजबूत करा. खास करून तरुणांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजवावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
नड्डा आणि शाह यांचं आवाहन
भाजपचे प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. सर्व मतदारांनी लोकशाहीच्या या उत्सवात भाग घेऊन मोठ्या प्रमाणावर मतदान करावं. प्रत्येक व्होट हे सुशासन, विकासाची यात्रा सुरू ठेवण्याच्या दिशेसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. एक समृद्ध आणि भ्रष्टाचार मुक्त त्रिपुरा निर्माण करण्यासाठी हे मत निर्णयाक ठरणार आहे, असं नड्डा यांनी म्हटलं आहे.
तर, त्रिपुरातील शांती आणि प्रगती कायम राखण्यासाठी आणि राज्याला प्रगतिशील करण्यासाठी तुमच्या मतदानाचा अधिकार वापरा. घरांच्या बाहेर पडा आणि समृद्ध त्रिपुरासाठी मतदान करा, असं आवाहन शाह यांनी केलं आहे.
नवा पक्ष मैदानात
त्रिपुरा जिंकण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद लावली आहे. पण भाजपचं सत्तेतील पुनरागमन कठिण असल्याचं दिसत आहे. राज्यातील बदलत्या समीकरणामुळे भाजपची सत्तेत येण्याची वाट बिकट झाली आहे. राज्यात एकमेकांचे शत्रू असलेले डावे पक्ष आणि काँग्रेस एकत्र मिळून निवडणूक लढत आहे.
त्रिपुराच्या शाही वंशाचे उत्तराधिकारी प्रद्योत बिक्रम माणिक्य देबबर्मन यांनी टिपरा मोथा हा नवा पक्ष स्थापन केला आहे. त्यांनीही आपला पक्ष निवडणुकीच्या मैदानात उभा केला आहे. त्यामुळे त्रिपुराच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. तर, टीएमसीनेही या निवडणुकीत पूर्ण शक्तीपणाला लावली आहे. त्यामुळे राज्यातील बदलते समीकरण आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आव्हानामुळे त्रिपुरा जिंकणं भाजपसाठी कठिण झाल्याचं चित्रं आहे.