TV9 WITT Summit 2024 : ‘व्हॉट इंडिया थिंक टुडे’मध्ये अनुराग ठाकूर काय बोलणार?; देशाचं कार्यक्रमाकडे लक्ष
गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही टीव्ही9 नेटवर्कने व्हॉट इंडिया थिंक टुडे समीटचं आयोजन केलं आहे. गेल्यावर्षी तुफान यश मिळाल्यानंतर यंदाच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. येत्या 25 फेब्रुवारीपासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे. नवी दिल्लीत तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमात विचारमंथन करणार आहेत.
नवी दिल्ली | 21 फेब्रुवारी 2024 : गेल्यावर्षी टीव्ही9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक टुडे‘ या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. पहिल्याच वर्षीच्या या कार्यक्रमात अनेक राजकीय नेते उपस्थित राहिले होते. यावेळी राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर मंथन करण्यात आलं होतं. या अभूतपूर्व यशानंतर यंदाही व्हॉट इंडिया थिंक्स टुडेचं आयोजन करण्यात आलं आहे. तीन दिवस हा सोहळा चालणार आहे. 25 फेब्रुवारीपासून नवी दिल्लीत हा कार्यक्रम सुरू होत आहे. न्यूज9 ग्लोबल समीटच्या उद्घाटनाच्या सत्रात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर उपस्थित राहणार आहेत. यावेळी अनुराग ठाकूर आपले विचार मांडणार आगहेत. या तीन दिवसीय कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्वयर उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, अमिताभ कांत, मंत्री डॉ. सुब्रमण्यम जयशंकर यांच्यासह अनेक मान्यवर आपली भूमिका मांडणार आहेत.
नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात अनुराग ठाकूर यांनी विकसित भारतावर भाष्य केलं होतं. ‘विकासित भारत@2047’ कार्यक्रम भारतातील तरुणांच्या भविष्यासह देशाला महासत्ता बनवण्यासाठी मोठी भूमिका बजावणार आहे, असं अनुराग ठाकूर म्हणाले होते. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी तरुणांना विविध क्षेत्रात आपली क्षमता दाखवण्याचे आणि नवे तंत्रज्ञान अंगिकारण्यासाठी तयार राहण्याचं आवाहन केलं होतं.
अनुराग ठाकूर यांचा राजकीय प्रवास
अनुराग ठाकूर यांची राजकीय कारकिर्द यशस्वी राहिली आहे. हिमाचल प्रदेशातील हमीरपूर लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत. सध्या ते देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री आहेत. क्रिकेटवर त्यांचं निस्सीम प्रेम आहे. त्यामुळे ते मे 2015 ते फेब्रुवारी 2017पर्यंत बीसीसीआयचे अध्यक्ष होते. हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धूमल यांचे ते धाकटे चिरंजीव. अनुराग ठाकूर यांनी पंजाबच्या जालंधरमधील डोबा कॉलेजमधून पदवी घेतली आहे. 2008मध्ये पहिल्यांदा ते लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019मध्ये पुन्हा खासदार म्हणून निवडून आले. त्यांना 2019मध्ये संसदरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यातही आलं आहे.
मोदींचं मुख्य भाषण
पंतप्रधान नरेंद मोदी यांची न्यूज9 ग्लोबल समीट व्हॉट इंडिया थिंक टुडे कार्यक्रमात महत्त्वाची उपस्थिती असणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांचं मुख्य भाषण होणार आहे. भारताच्या विकासासह राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातील देशाच्या दृष्टीकोणाबाबत मोदी महत्त्वाचं भाष्य करणार आहेत. तसेच भारत जगातील टॉप देशात पोहोचण्याची गाथाही मोदी विषद करणार आहेत.