BREAKING | गुजरातच्या जुनागड येथे इमारत कोसळली, मोठी दुर्घटना
गुजरातमध्ये पावसाचा हाहा:कार सुरु आहे. पावसामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालंय. गुजरातमधील पावसाच्या रौद्र रुपाचे अनेक व्हिडीओ समोर येत असताना जुनागडमध्ये आज एक मोठी दुर्घटना घडली.
जुनागड | 24 जुलै 2023 : गुजरातच्या जुनागड येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे जुनागडमध्ये दोन मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत 10 ते 12 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तवण्यात येतेय. घटना घडल्यानंतर तातडीने स्थानिकांनी प्रशासनाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर तातडीने बचाव पथकाची टीम घटानस्थळी दाखल झालीय. स्थानिक नागरीक आणि प्रशासन यांच्या प्रयत्नांतून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. संबंधित घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित घटना ही आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती मिळत आहे. संबंधित इमारत ही बाजार परिसरात होती. त्या परिसरात बाजार भरतो. त्यामुळे संबंधित परिसर प्रचंड रहदारीचा आहे. याशिवाय इमारतीच्या तळमजल्यावर दुकानं होती तर मागच्या बाजूला घरं होती.
या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांमध्ये दुकानदार आणि दुकानात असलेल्या ग्राहकांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळत आहे. सध्या घटनास्थळोी बचाव कार्य सुरु आहे.
बचावकार्यसाठी आता घटनास्थळी एनडीआरएफची टीमदेखील घटनास्थळी दाखल झाली आहे. जुनागडमध्ये पूर परिस्थिती असल्याने एनडीआरएफची पथकं आधीपासूनच तैनात आहेत. त्यामुळे संबंधित घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचं पथक घटनास्थळी तातडीने दाखल झालंय. याशिवाय रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झालीय.
गुजरातमध्ये प्रचंड मुसळधार पाऊस
गुजरातमध्ये सध्या प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय. दोन दिवसांपूर्वी जुनागड येथील पुराचे भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हिडीओंमध्ये पाऊस किती भयंकर कोसळतोय याचा अंदाज येतोय. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आलाय. यामुळे शहरातील अनेक वाहने पुराच्या पाण्यात वाहून गेले. यामध्ये महागड्या कारचादेखील समावेश आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंपैकी काही व्हिडीओ हे काळीज पिळवटून टाकणारी आहेत. कारण या व्हिडीओत काही म्हशी या पुराच्या पाण्यात वाहून जाताना दिसल्या होत्या. तर दुसऱ्या एका व्हिडीओत एक व्यक्ती त्याच्या कारसह पाण्याच वाहून जाताना दिसली होती. यावेळी व्हिडीओ आक्रोशाचा देखील आवाज येतोय. त्यामुळे संबंधित व्हिडीओ पाहिल्यावर मन सुन्न होतं. जुनागडमधील पावसाचाल हा प्रकोप अजूनही सुरुच आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. तसेच गुजरातमध्ये पावसाचा हाहा:कार सुरु असतानाच आज जुनागडमध्ये दुमजली इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे.