कुतुब मिनारपेक्षाही मोठ्या पिलरसह रेल्वेचा पूल कोसळला, 17 लोकांचा जागीच मृत्यू; अनेकजण अडकले
मिझोराममध्ये अत्यंत मोठी आणि दुर्देवी दुर्घटना घडली आहे. रेल्वेचा निर्माणाधीन पूल कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत 17 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या पुलाखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सायरांग | 23 ऑगस्ट 2023 : मिझोराममध्ये आज सकाळी एक प्रचंड मोठी दुर्घटना घडली आहे. सायरांग येथे रेल्वेचा निर्माणाधीन पूल कोसळला आहे. त्याच्यासोबत कुतुब मिनारहूनही अधिक उंच पिलरही कोसळला आहे. या दुर्घटनेत 17 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 30 ते 40 लोक या दुर्घटनेत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा सर्वांना ढिगाऱ्याखालून काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तसेच या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सायरांग जवळ सकाळी 10 वाजता ही दुर्घटना घडली आहे. कुरुंग नदीवर या पुलाचं बांधकाम सुरू होतं. पूल कोसळल्याने बैराबी आणि सायरांग क्षेत्राचा संपर्कच तुटला आहे. रेल्वे पूलाचा जो पिलर कोसळला आहे. त्याची उंची सुमारे 104 मीटर असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजे कुतुब मिनारपेक्षाही 42 मीटर उंच हा पिलर आहे. तो पिलर कोसळल्याने अनेकजण त्याखाली दबले गेले आहेत.
रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल
हा निर्माणाधीन पूल मिझोरामची राजधानी एझॉलपासून सुमारे 20 किलोमीटर दूर आहे. नॉर्थ ईस्ट फ्रंटीयर रेल्वेचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी सब्यासाची डे यांनी या घटनेची माहिती दिली. या दुर्घटनेची माहिती मिळताच अधिकारी तात्काळ घटनास्थळी रवाना झाले आहेत. मदतकार्य सुरू असून जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं जात आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आल्याचं डे यांनी सांगितलं.
तर मोठी दुर्घटना घडली असती
रेल्वे पुलाचं काम सुरू होतं. मात्र, हा पूल तयार असताना आणि त्यावरून रेल्वे जात असताना ही दुर्घटना घडली असती तर या परिसरात मृत्यूचं तांडव निर्माण झालं असतं, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. तर, बांधकाम सुरू असतानाच पूल कोसळल्याने पुलाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पूलाचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं बांधलं जात होतं, त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचंही सांगितलं जात आहे.
मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त
मिझोरामचे मुख्यमंत्री जोरम थांगा यांनी ट्विट करून या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. सायरांग येथे एक निर्माणाधीन पूल कोसळला आहे. त्यामुळे 17 मजुरांचा मृत्यू झाला आहे. मृताच्या कुटुंबीयांप्रती संवेदना आहे. जखमी लवकर बरे व्हावेत याची प्रार्थना करतो, असं थांगा यांनी म्हटलं आहे.