अंडरवर्ल्ड डॉन ते दहशतवादी, पाहा तिहारमध्ये कोण आहेत केजरीवाल यांचे शेजारी?
दिल्लीचे मुख्यंमत्री अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. कारण कोर्टाने त्यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तिहारमध्ये जाण्याचा हा केजरीवाल यांची तिसरी वेळ आहे. पण यावेळी त्यांच्या शेजारी अनेक गुन्हेगार आहेत. ज्यामध्ये एका दहशतवाद्याचा देखील समावेश आहे.
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांना आता न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. सध्या ते तिहार जेलमध्ये आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंग क्रमांक दोनमध्ये ठेवण्यात आले आहे. जी एक 14×8 ची खोली आहे. येथे सिमेंटच्या प्लॅटफॉर्मवर झोपण्यासाठी गादी, घोंगडी आणि उशी देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांच्यासाठी त्यांच्या घरातून जेवण येत आहे. पण असं असलं तरी केजरीवाल बंद असलेल्या तुरुंगात अनेक कुख्यात गुंड बंद आहेत.
‘इंडिया टुडे’च्या रिपोर्टनुसार, अरविंद केजरीवाल बंद आहेत त्या खोलीच्या शेजारीच अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन, गँगस्टर नीरज बवाना आणि दहशतवादी जियाउर रहमान हे देखील बंद आहेत. छोटा राजन हा एकेकाळी दाऊद इब्राहिमचा हस्तक होता. पण नंतर दोघांमध्ये वैर निर्माण झाले होते. त्याने दाऊदला मारण्यासाठी प्रयत्न केल्याचे देखील बोलले जाते. दुसरा आहे नीरज बवाना. याच्यावर ४० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. असा कोणताच गुन्हा नाही जो त्याने केला नाही. झियाउर रहमान हा इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित आहे. असे तीन गुन्हेगार अरविंद केजरीवाल यांच्या समोर तुरुंगात बंद आहेत. या सर्व गुन्हेगारांमध्ये छोटा राजन सर्वात धोकादायक आहे.
तिहार जेलमध्ये एकूण 9 तुरुंग आहेत. सीएम केजरीवाल यांना तुरुंग क्रमांक २ मध्ये ठेवण्यात आले आहे. याच तुरुंगात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन, गुंड नीरज बवाना आणि जियाउर रहमान हे देखील बंद आहेत. याच तुरुंगात ‘आप’चे नेते संजय सिंह देखील बंद होते. नंतर त्यांना कारागृह क्रमांक 5 मध्ये हलवण्यात आले होते. मंगळवारी सुप्रीम कोर्टानेही त्यांना जामीन मंजूर केलाय.
अरविंद केजरीवाल यांना तिहारमध्ये आणल्यानंतर त्यांची पहिली रात्री अस्वस्थपणे काढली. ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना घरून जेवण आणण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्या खोलीबाहेर सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत.
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच तिहार तुरुंगात गेलेले नाहीत. 2011 मध्ये अण्णांच्या आंदोलनादरम्यान कलम 144 चे उल्लंघन केल्याप्रकरणी देखील त्यांना अटक झाली होती. तेव्हा देखील अनेकांना अटक करण्यात आली. यानंतर 2014 मध्येही नितीन गडकरी बदनामी प्रकरणी त्यांना तिहार तुरुंगात जावे लागले होते. त्यानंतर आता तिसऱ्यांदा ते तिहार तुरुंगात आले आहेत. 1 एप्रिल रोजी न्यायालयाने त्यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.