आता 24 तासात कधीही, तुमच्या सोयीनुसार कोरोना लस घ्या! केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा
आता रुग्णालये आपल्या सुविधेनुसार रुग्णांचा 24 तासांत कधीही कोरोनाची लस देऊ शकणार आहे. तशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.
नवी दिल्ली : 1 मार्चपासून देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु करण्यात आला आहे. या टप्प्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह वयानं ज्येष्ठ असलेल्या अनेक नेतेमंडळींनीही कोरोनाची लस टोचून घेतली आहे. मात्र, दुसऱ्या टप्प्यात सकाळी 9 पासून ते संध्याकाळी 5 पर्यंतच कोरोना लसीकरण केंद्रांवर लस दिली जात होती. पण आता रुग्णालये आपल्या सुविधेनुसार रुग्णांचा 24 तासांत कधीही कोरोनाची लस देऊ शकणार आहे. तशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.(Dr. Harshvardhan’s decision to remove time limit on corona vaccination)
लसीकरणाची गती वाढवण्यावर भर
कोरोना लसीकरणाची गती वाढवण्यासाठी सरकारने वेळेची मर्यादा उठवली आहे. देशातील नागरिक आता आपल्या सोयीनुसार 24 तासांत कधीही कोरोनाची लस घेऊ शकणार आहेत. ही घोषणा करताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी यांना नागरिकांच्या वेळेचं महत्व आणि त्यासोबतच त्यांच्या आरोग्याबाबत चांगली जाण आहे, असं डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलंय.
केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी लसीकरणाची वेळमर्यादा उठवल्याबाबत माहिती दिली. भूषण यांनी सांगितलं की, सरकारने लसीकरणाची सकाळी 9 ते संध्याकाळी 5 ही वेळमर्यादा उठवली आहे. केंद्र सरकारनं ही घोषणा केल्यानंतर आता रुग्णालयांनी संध्याकाळी 5 नंतर लसीकरण सुरु ठेवायचं की नाही, हा निर्णय घ्यायचा आहे, असंही भूषण म्हणाले.
लसीकरणाची वेळ निश्चित करण्याची रुग्णालयांना गरज नाही
कोरोना प्रतिबंधात्मक लस नागरिकांना देण्याबाबत वेळ निश्चित करण्याची रुग्णालयांना गरज नाही. ते कधीही आणि कुठल्याही दिवशी लसीकरण वाढवायचं की कमी करायचं याबाबतचा निर्णय घेऊ शकतात, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. लसीकरणावरील वेळमर्यादा उठवल्यामुळे या मोहिमेला गती देण्यास मदत होईल, कारण अधिकाधिक लोक ही लस घेऊ शकतील, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लस टोचली
राष्ट्रपती कोविंद यांनी आर्मी रिसर्च आणि रिफरल हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. राष्ट्रपती कोविंद यांनी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात परवानगी असलेल्या सर्वांनी कोरोना लस टोचून घेण्याचं आवाहन केलं आहे. राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती कोविंद यांनी इतिहासातील सर्वात मोठी लसीकरण मोहीमेला यशस्वीपूर्वक पूर्ण करत असलेले सर्व डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी आणि प्रशासकांचे आभार व्यक्त केले आहेत. राष्ट्रपती कोविंद यांनी ज्यावेळी कोरोना लस घेतली त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची कन्याही उपस्थित असल्याचं सांगण्यात आलं आहे.
President Ram Nath Kovind, accompanied by his daughter, was administered the COVID-19 vaccine at the Army R&R Hospital, Delhi, today. pic.twitter.com/xf6VQ6pIwS
— President of India (@rashtrapatibhvn) March 3, 2021
संबंधित बातम्या :
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टोचली कोरोना लस, कोरोना योद्धांचेही मानले आभार
Mumbai COVID-19 Vaccination center | मुंबईतील 29 खासगी रुग्णालयात कोरोनाची लस मिळणार, पाहा यादी
Dr. Harshvardhan’s decision to remove time limit on corona vaccination