Electric Highway | प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, देशात पहिल्यांदाच बांधणार इलेक्ट्रीक हायवे
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाद्वारे इलेक्ट्रीक महामार्ग बांधण्याचे काम दिले जाईल. तसेच वीज मंत्रालयाकडून 3.50 रु.प्रति युनिटदराने वीज पुरविली जाईल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली | 14 सप्टेंबर 2023 : देशात हायवे उभारणीचे काम वेगाने होत आहे. कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी हायवे कनेक्टीविटी महत्वाची असते. आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांनी हायवेवरुन प्रवास करणाऱ्या एक आनंदाची बातमी दिली आहे. देशात इलेक्ट्रीक वाहनांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. इलेक्ट्रीक वाहने अनेकांच्या उपजिविकेचे महत्वाचे साधन बनली आहेत. याच बाबींचा विचार करताना सरकार आता देशात इलेक्ट्रीक हायवे ( Electric Highway ) डेव्हलपमेंट करण्यासाठी काम करीत आहे.
इलेक्ट्रीक महामार्गांचा विकास
देशात रस्त्यांचा विकास करण्याबरोबरच इलेक्ट्रीक महामार्गांचा विकास करण्यावर वेगाने काम होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मागे भारतातील पहिला इलेक्ट्रीक महामार्ग म्हणून दिल्ली आणि जयपूर मार्गांचा विकास करण्याची इच्छा बोलून दाखविली होती.
वेगाने सुरु आहे काम
वाहन घटक उत्पादक संघटनेच्या (ECMA) कार्यक्रमात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाद्वारा इलेक्ट्रीक राजमार्ग तयार करण्याचा अधिकार दिला जाणार आहे.तसेच या इलेक्ट्रीक महामार्गासाठी वीज मंत्रालयाकडून 3.50 रुपये प्रति युनिटदराने वीज पुरविण्यासाठी बोलणी सुरु आहेत. नितीन गडकरी यांनी म्हटले होते की कोणत्याही सरकारी कंपनीला वीज मंत्रालयाकडून स्वस्तात वीज पुरविण्याचे काम काही फारसे अवघड नाही. इलेक्ट्रीक महामार्ग आर्थिकदृष्ट्या अधिक व्यवहारीक आहे. या इलेक्ट्रीक महामार्गासाठी इलेक्ट्रीक केबल जाळे टाकण्याचे काम खाजगी गुंतवणूकदारांना दिले जाणार आहे.
नागपुरात पायलट प्रोजेक्ट
नॉर्वे आणि स्वीडन सारख्या देशात हे तंत्रज्ञान खूपच प्रचलित आहे. येथे इलेक्ट्रीक महामार्गाचे संचलन सुरु आहे. यात इलेक्ट्रीक हायवेवर इलेक्ट्रीक ट्रॅक्शनच्या आधारे काम केले जाते. जसे रेल्वेचे कामकाज चालते. यात वीजेच्या केबल लावल्या जातात. या वीजेच्या आधारे वाहनचालकांची गाड्या धावतात. प्रायोगिक तत्वावर सरकार नागपुरात पहिला इलेक्ट्रीक महामार्ग उभारण्याच्या योजनेवर काम करीत आहे.