UP Election 2022: भीम आर्मीच्या चंद्रशेखर आजाद यांनी घेतली अखिलेश यादवांची भेट, आघाडीवर चर्चा; मायावतींची डोकेदुखी वाढणार?
भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आजाद यांनी दुसऱ्यांदा समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये आघाडीवर चर्चा झाली.
लखनऊ: भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आजाद यांनी दुसऱ्यांदा समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये आघाडीवर चर्चा झाली. त्यामुळे भीम आर्मी निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. भीम आर्मी आणि समाजवादी पार्टीची आघाडी झाल्यास बसपा सुप्रिमो मायावती यांची मात्र डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चंद्रशेखर आजाद यांनी आज सकाळीच अखिलेश यादव यांची भेट घेऊन त्यांच्याशी आघाडीबाबत चर्चा केली. त्यानंतर चंद्रशेखर आजाद यांनी मीडियाशी संवाद साधून भाजपला पराभूत करण्याचा मनसुबा व्यक्त केला. समाजवादी पार्टीसोबत मिळून आम्ही भाजपला पराभूत करणार आहोत. देशात सर्वाधिक अत्याचार दलितांवर होत असतात. त्यामुळे आम्ही मी नेहमीच दलितांची बाजू घेऊन उभा असतो, असं सांगतानाच आम्ही विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत आजाद समाज पार्टी उत्तर प्रदेशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल, असा दावाही त्यांनी केला.
छोट्या पक्षांशी आघाडी
दरम्यान, दुसरीकडे अखिलेश यादव यांनी राज्यातील छोट्या पक्षांशी आघाडी करून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जनवादी पार्टी (सोशालिस्ट), राष्ट्रीय लोकदल, अपना दल (कमेरावादी), प्रगतीशील समाजवादी पार्टी (लोहिया), महान दल, टीएमसीसोबतही समाजवादी पार्टीने आघाडी केली आहे.
दलित-मुस्लिम-जाट समीकरण
जयंत चौधरी यांच्या नंतर चंद्रशेखर आजाद यांच्यासोबत अखिलेश यादव यांनी आघाडी केल्यास पश्चिमी यूपीत दलित-मुस्लिम आणि जाट असं समीकरण तयार होईल. संपूर्ण उत्तर प्रदेशात जाट समाजाची लोकसंख्या 4 टक्के आहे. तर पश्चिमी यूपीत जाट समाजाची लोकसंख्या 20 टक्के आहे. तर मुस्लिमांची लोकसंख्या 30 ते 40 टक्के आहे. तसेच दलितांची लोकसंख्या 25 टक्के आहे. त्यामुळे या आघाडीच्या प्रयोगाचा समाजवादी पार्टीला मोठा फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
डोकेदुखी वाढणार
मायावती आणि चंद्रशेखर आजाद दोघेही जाटव समाजातून येतात. शिवाय दोन्ही नेते एकाच क्षेत्रातून येतात. समाजवादी पार्टीने चंद्रशेखर आजाद यांच्याशी आघाडी केल्यास दलित मतांमध्ये फूट पडेल. त्याचा फायदा समाजवादी पार्टी आणि भाजपला मिळू शकतो. समाजवादी पार्टीची चंद्रशेखर यांच्याशी आघाडी झाल्यास त्यांना प्रत्येक मतदारसंघात चार ते पाच हजार मते मिळू शकतात. त्यामुळे पश्चिम उत्तर प्रदेशात ही मते गेम चेंजर ठरू शकतात. त्यामुळे मायावतींची डोकेदुखी वाढू शकते, असं राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे.
सात टप्प्यात मतदान
उत्तर प्रदेशात एकूण 403 जागा आहेत. राज्यात सात टप्प्यात मतदान होणार आहे. या टप्प्यानुसार 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचे निकाल 10 मार्च रोजी जाहीर होणार आहेत.
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वरhttps://t.co/GtnBm124ak#BREAKING | #BreakingNews | #NewsUpdate
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 14, 2022
संबंधित बातम्या:
भाजपचे 9 बंडखोर आमदार आज समाजवादी पक्षात सामील होण्याची शक्यता
MP Crime : मध्य प्रदेशात नात्याला काळिमा; सैनिकाच्या पत्नीवर दिराकडून 18 वर्षे बलात्कार
Budget 2022 Date : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर, 1 फेब्रुवारीला बजेट सादर होणार