लखनऊ: दिल्लीतील जहांगीरपुरी (Jahangirpuri Violence) येथे झालेल्या हिंसेनंतर आता यूपी पोलीस (UP Police) हाय अॅलर्टवर (High Alert) आहेत. दिल्लीतील दंगलीच्या पार्श्वभूमीवर यूपीत अनुचित प्रकार घडू नये म्हणून फ्लॅग मार्च काढण्यात आला. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक शहरात मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. लखनऊचे पोलीस आयुक्त डीके ठाकूर यांनी स्वत: संवेदनशील परिसरातील सूत्रे हाती घेतली आहेत. आयुक्तांनी रस्त्यावर उतरून जुने लखनऊमधील नक्खास, चौक, पाटानालासहीत अनेक भागांची पाहणी केली. यावेळी आयुक्तांनी या विभागातील प्रतिष्ठीत आणि जबाबदार नागरिकांशी चर्चाही केली. आपल्या विभागात अनुचित प्रकार होणार नाही. शांततेचं वातावरण राहील याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. तसेच पोलीस आयुक्तांनी पोलिसांनाही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिल्लीच्या जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीच्या शोभायात्रेवर दगडफेक झाली होती. त्यामुळे या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
जहांगीरपुरी येथील हिंसक घटनेनंतर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यातील सर्व संवेदनशील परिसरात करडी नजर ठेवण्याच्या सूचना दिल्आ आहेत. दिल्लीला लागून असलेल्या भागात सर्वाधिक लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. या भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये असे आदेशच देण्यात आले आहेत, अशी माहिती अप्पर पोलीस महासंचालक ( कायदा सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितलं.
दिल्लीच्या बाजूलाच असलेला नोएडातही अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. नोएडा, सेंट्रल नोएडा आणि ग्रेटर नोएडा आदी तिन्ही पोलिसांनी आपआपल्या झोनमध्ये गस्त वाढवली आहे. गर्दीची ठिकाणं, बाजार, शॉपिंग मॉल, मेट्रो स्टेशन आदी ठिकाणी ही गस्त वाढवण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष ठेवून आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष ठेवलं जात आहे.
कुशीनगरचे एसपी धवल जायसवाल यांनी पडरौना नगरात पोलीस फोर्ससह फ्लॅगमार्च केला. यावेळी त्यांनी संपूर्ण परिसरांची पाहणी केली. विभागातील नागरिकांशी चर्चा केली. तसेच त्यांना शांततेचं आवाहनही केलं.
संबंधित बातम्या:
Violence in Delhi : दिल्ली हिंसेचा तपास करण्यासाठी दहा पथकं तैनात, दंगल आणि हत्येचे गुन्हे दाखल
Violence in Delhi : हनुमान जयंतीदिनी दिल्लीत हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक आणि तुफान राडा; केजरीवालांचं शांततेचं आवाहन