Uttar Pradesh | उत्तर प्रदेशातलं एक गाव, जिथं जावयांचीच संख्या भारी, तिसऱ्या पिढीचेही जावई वास्तव्यास!
उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये एका गावात 40 पेक्षा जास्त जावई राहतात. जावयांची संख्या जास्त झाल्यानं गावाचं नाव बदवून दामादनपुरवा असं ठेवण्यात आलं. जेमतेम 500 लोकवस्ती असलेलं गाव कसं वसलं पाहुयात....
उत्तर प्रदेशातलं (Uttar Pradesh) कानपूरमधलं एक गाव जावयांमुळेच ओळखलं जातं. कानपूर जिल्ह्यातील (Kanpur) अकबरपूर तहसीलपासून 10 किलोमीटर अंतरावर दमादनपुरवा (damadanpurwa) हे गाव आहे. स्थानिकांच्या मते, या गावात सर्वाधिक घरं जावयांचीच आहेत. गावात जवळपास 70 घरं असून त्यापैकी 40 घरं जावयांची आहेत. योगा-योगाने हळू हळू एक-एक असे जावई येथे येऊन राहू लागले. त्यामुळे आजूबाजूच्या गावांतील लोकांनी या वसतीचं नाव दमादनपुरवा असं ठेवलं. अखेर सरकारी दस्तावेजांमध्येही हा बदल झाला. सरियापूर गावाच्या अंतर्गत हे गाव येते. गावाचा इतिहास पाहिला तर 1970 च्या मधील एक कथा सांगितली जाते. सरियापूर गावातल्या महिलेच्या लग्नानंतर खरं तर हे गाव वसण्यास सुरुवात झाली, असं मानलं जातं. आता ती महिला या जगात नसली तरीही गावाचा इतिहास सांगताना येथील वृद्ध लोक तिची आठवण आवर्जून काढतात.
काय आहे गावाचा इतिहास?
गावातील वृद्ध सांगतात, 1970 मध्ये सरियापूर गावातील राजरानी यांचे लग्न जगम्मनपूर गावातील सावरे कठेरिया यांच्याशी झाले. सांवरे हे सासुरवाडीला राहू लागले. गावातील त्यांचे घर लहान पडू लागले. त्यानंतर त्यांना गावाबाहेर जमीन देण्यात आली. आता हे दोघेही लेक-जावई या जगात नाहीत. पण या जमिनीवर आजू-बाजूला घरं वसू लागली आणि तिथेही जास्तीत असेच लोक येऊ लागले. जुरैया घाटमपूर येथील विश्वनाथ, झबैया अकबरपूर येथील भरोसे, अंडवा बरौर येथील रामप्रसाद यांसारखे लोकांनी सरियापूरमधील मुलींशी लग्न केले आणि याच जमिनीच्या आजू-बाजूला येऊन राहिले. 2005 मध्ये येथील जावयांची घरं 40 पर्यंत पोहोचली. त्यामुळे स्थानिकांनी गावाचं नाव दमादनपुरवा असं ठेवलं. तोपर्यंत हे नाव केवळ तोंडीच होतं. दोन वर्षांनी येथे शाळा उघडली. शाळेच्या दाखल्यावर मात्र दमादनपुरवा हे नाव नोंदवण्यात आलं. एकिकडे जावयांची परंपरा चालत राहिली तर दुसरीकडे गावाचं नावही अधिक ठळक होत गेलं.
तिसऱ्या पिढीतही जावईच आले…
गावातील ज्येष्ठ व्यक्ती रामप्रसाद यांचे वय 78 वर्षे आहे. रामप्रसाद हे 45 वर्षांपूर्वी सासुरवाडीला येऊन राहू लागले. सर्वात नवे जावई म्हणजे अवधेश हे नुकतेच पत्नी शशीसोबत येथे वास्तव्यास आले आहेत. आता तर तिसऱ्या पिढीतील जावईदेखील येथे आले आहेत. जसवापूर गजनेर येथून सासरवाडीला आलेले अंगनू यांचंही निधन झालं. तेदेखील इथले जावई होते. अंगनू यांचे पुत्र रामदास यांचे जावई अवधेश हे तीन वर्षांपूर्वी येथे वास्तव्यास आले आहेत. दमादनपुरवा गावाची लोकसंख्या 500 आहे तर मतदार संख्या 270. अनेक नवे लोक गावाचं नाव वाचून हसतात. पण इथल्या लोकांना यात फारसं नवल वाटत नाही. आता तर पोस्टाच्या पत्त्यावरही हेच नाव नोंदवण्यात येतं.