WITT: …म्हणून आदिवासी समाजाला UCC च्या बाहेर ठेवलं; मुस्लिमांच्या प्रश्नांवर बोलताना धामी नेमकं काय म्हणाले?
टिव्ही 9 नेटवर्कचा मेगा ईव्हेट असलेल्या व्हाट इंडिया थिंक्स टुडे या कार्यक्रमाचा आज दुसरा दिवस आहे. या कार्यक्रमामध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे देखील सहभागी झाले आहेत.

टिव्ही 9 नेटवर्कचा मेगा ईव्हेट असलेल्या व्हाट इंडिया थिंक्स टुडे (What India Thinks Today) हा कार्यक्रम दिल्लीमध्ये सुरू आहे. हा दोन दिवसांचा कार्यक्रम आहे. भारत मंडपममध्ये हा कार्यक्रम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. आज व्हाट इंडिया थिंक्स टुडे समिटचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी या कार्यक्रमामध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे देखील सहभागी झाले. ‘एक देश, एक विधान नवा हिंदुस्तान’ या विषयावर बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत ‘एक देश, एक विधान नवा हिंदुस्तान’या व्हिजनवर वाटचाल करत आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं.
नेमकं काय म्हणाले धामी?
गेल्या दहा वर्षांमध्ये अनेक नवे निर्णय घेण्यात आले. कलम 370 ला हटवण्यात आलं. राम मंदिराचं निर्माण केलं. यूसीसी सारखा निर्णय घेतला. उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा (UCC) लागू करण्यात आला असं धामी यांनी म्हटलं. यावेळी त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला की, तेथील मुस्लिम समाजाचा समावेश हा समान नागरी कायद्यामध्ये करण्यात आला, मात्र आदिवासी समाजाला या कायद्यातून दिलासा देण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं की, संविधानातच आदिवासी समाजासाठी तशी तरतूद आहे. संविधानमध्ये जशी तरतूद आहे, त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला.राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यापूर्वी आम्ही विविध राजकीय पक्षांसोबत चर्चा केली होती. जर आदिवासी समाजानं म्हटलं की आमचाही यामध्ये समावेश करा तर आम्ही त्यांचा समान नागरी कायद्यामध्ये समावेश करू आम्हाला काहीही समस्या नाही.
लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला
दरम्यान मुख्यमंत्र्यांचा रोडमॅप कसा असणार आहे, असा प्रश्नही त्यांना यावेळी विचारण्यात आला. यावर उत्तर देताना धामी म्हणाले की, 2022 मध्ये आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात निवडणूक लढलो, सत्तेमध्ये देखील आलो. आम्ही त्यावेळी येथील जनतेला वचन दिलं होतं की, जर आम्ही सत्तेत आलो तर समान नागरी कायदा लागू करू, त्यामुळे जनतेनं पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवला. उत्तराखंडमध्ये दर पाच वर्षांनी सरकार बदलते हा समज तेथील जनतेनं चुकीचा ठरवला असं धामी यांनी म्हटलं आहे. आम्ही कोणत्या एका समाजासाठी काम करत नसून, आम्ही सर्वांसाठी काम करतो असं धामी यांनी म्हटलं आहे.