400 तास मृत्यूशी झुंज… देशभर प्रार्थना, अखेर सर्व कामगार बाहेर; रेस्क्यू ऑपरेशन सक्सेस
उत्तरकाशीच्या सिलक्यारा टनेल अडकलेले कामगार अखेर बाहेर आले आहेत. तब्बल 17 दिवसानंतर या कामगारांची सुटका झाली आहे. 400 तास या टनेलमध्ये हे कामगार अडकले होते. ना हवा होती, ना पाणी. दोन दिवसांपूर्वी तर या कामगारांना ऑक्सिजनही पुरवण्याची वेळ आली होती. त्यामुळे हे कामगार वाचले. सुदैवाने या 17 दिवसानंतरही हे कामगार जिवंत होते. या कामगारांची सुटका होताच सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
उत्तरकाशी | 28 नोव्हेंबर 2023 : उत्तर काशीतील एका टनेलमध्ये अडकलेल्या 41 मजुरांपैकी तीन कामगार बाहेर आले आहेत. तब्बल 400 तासानंतर म्हणजे 17 दिवसानंतर तीन कामगार बाहेर आले. त्यानंतर एक एक करत 25 कामगारांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर तासाभरातच सर्वच्या सर्व 41 कामगारांना बाहेर काढण्यात आलं आहे. या कामगारांना टनेलमधून बाहेर काढल्यानंतर थेट रुग्णालयात नेण्यात आलं आहे. त्याच्यावर तिथे उपचार करण्यात येत आहेत. या सर्व कामगारांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम काम करत होती.
तब्बल 17 दिवसानंतर सिलक्यारा टनेलमधून कामगार बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. या टनेलमध्ये 41 कामगार अडकले होते. त्यांना हवा, पाणीही मिळत नव्हते. त्यामुळे 17 दिवसांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. अखेर आज हे ऑपरेशन यशस्वी झाले. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीमला यश आलं. हे ऑपरेशन अंतिम टप्प्यात असताना स्वत: मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यावेळी उपस्थित होते. या रेस्क्यू ऑपरेशनपूर्वी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पूजा अर्चा केली. बाबा बौख नाग देवतेला त्यांनी श्रीफळ चढवलं होतं. जेव्हा पहिला कामगार बाहेर आला, तेव्हा पुष्कर सिंह धामी यांनी त्याची विचारपूस केली. तसेच तात्काळ या कामगाराला रुग्णालयात नेण्यात आलं.
आधी एक नंतर पाच…
या टनेलमधून पहिला कामगार बाहेर आला आणि रेस्क्यू टीमने एकच जल्लोष केला. त्यानंतर रेस्क्यू टीमने अधिक प्रयत्न केले आणि दुसऱ्या टप्प्यात पाच कामगारांना बाहेर काढलं. एक एक करून कामगारांना बाहेर काढलं जात आहे. एनडीआरएफच्या तीन टीम या कामाला लागल्या आहेत.
नंतर नऊ मजूर बाहेर
नंतर कामगारांना बाहेर काढण्याचं काम अत्यंत वेगाने सुरू झालं. नंतर नऊ मजूर बाहेर काढले. एक एक करून एकूण 25 मजुरांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. मुख्यमंत्री धामी आणि केंद्रीय मंत्री व्हिके सिंह यांनी टनेलमधून बाहेर आलेल्या मजुरांचं स्वागत केलं आहे.
तो आनंद अवर्णनीय
एक एक करून कामगार बाहेर आले. यावेळी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. हे कामगार बाहेर आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. एकदाची सुटका झाल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती.