घोटाळेबाज त्रिकूटाच्या वसुलीला वेग, 18 हजार कोटी जप्त; माल्याला आर्थिक घरघर!
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी माल्या, मोदी आणि चोक्सीच्या संपत्तीच्या विक्रीद्वारे 13109 कोटी रुपये मिळविल्याची माहिती दिली होती. बँकांनी अलीकडच्या रिकव्हरीत 792 कोटी रुपये वसूल केले आहेत.

नवी दिल्ली : बँकांना कोट्यावधी (BANK FRAUD) रुपयांचा चुना लावून फरार कर्जबुडव्यांकडून वसुलीची मोहीम जोरात सुरू आहे. विजय माल्या (Vijay Mallya), नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याकडून बँकांनी आतापर्यंत 18 हजार कोटी रुपये वसूल केले आहेत. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात यासंबंधीची माहिती सादर केली. न्यायालयाच्या निर्देशानुसार कर्जबुडव्यांविरोधात पीएमएलएच्या (PMPLA ACT) अंतर्गत कारवाई केली जात असल्याची माहिती मेहता यांनी दिली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी माल्या, मोदी आणि चोक्सीच्या संपत्तीच्या विक्रीद्वारे 13109 कोटी रुपये मिळविल्याची माहिती दिली होती. बँकांनी अलीकडच्या रिकव्हरीत 792 कोटी रुपये वसूल केले आहेत.
पीएमएलए केस प्रलंबित
केंद्राच्या वतीने आज सर्वोच्च न्यायालयात पीएमएलए अंतर्गत दाखल प्रकरणांची माहिती देण्यात आली. सध्या देशात ईडीद्वारे मनी लाँड्रिंग अंतर्गत 4700 प्रकरणांचा तपास सुरू आहे. सर्व दाखल प्रकरणातील घोटाळ्याचा आकडा 67000 कोटी रुपयांच्या पलीकडे गेला आहे. मनी लाँड्रिग प्रकरणांच्या सुनावणीच्या संथ गतीचा फटका पैशांची रिकव्हरी करण्यासाठी होत असल्याचे सॉलिसिटर जनरल यांनी न्यायालयात सांगितले. दरम्यान, मनी लाँड्रिग कायद्यात फेरबदल करण्यासाठी कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टाची दारं ठोठावली आहे. केंद्राच्या वतीने देखील याप्रकरणी म्हणणं सादर करण्यात आलं आहे.
माल्ल्याला आर्थिक घरघर?
विजय माल्ल्या पूर्णपणे कंगाल झाल्याची माहिती आहे. कोर्ट कचेऱ्यांचा फेरा मागे लागल्याने आर्थिक नाकेबंदी झाल्याने मल्ल्याकडे वकिलांना देण्याइतपतही पैसे नाहीत. त्यामुळे वेळेत फी नाही दिली तर खटला लढणार नसल्याचा इशारा त्याच्या वकिलाने दिला आहे. त्यामुळे माल्ल्याची डोकेदुखी वाढली आहे. भारतातील बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून मल्ल्या लंडनला फरार झाला आहे. कधीकाळी पैशांची उधळपट्टी करणाऱ्या मल्ल्याला आता मात्र आर्थिक घरघर लागली आहे. त्याला लंडनमध्ये हजार आणि लाख रुपयांचाही हिशोब ठेवावा लागत आहे. त्याच्या वैयक्तिक खर्चांनाही चाप लागला असून वकिलांना देण्यासाठीही त्याच्याकडे पैसे उरले नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.
इतर बातम्या :