प्रार्थना करा… ममता बॅनर्जींच्या कपाळाला मोठी दुखापत, थेट रुग्णालयातला फोटो समोर
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठी दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. ममता बॅनर्जी यांच्या कपाळाला मोठी दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.
कोलकाता | 14 मार्च 2024 : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठी दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. ममता बॅनर्जी यांच्या कपाळाला मोठी दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. तृणमूल काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. ममता बॅनर्जी यांची प्रकृती बरी व्हावी यासाठी प्रार्थना करा, असं आवाहन या ट्विटद्वारे करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. ममता बॅनर्जी यांच्याकडून पश्चिम बंगालमध्ये उमेदवारांची घोषणादेखील करण्यात आली आहे. आता बंगालमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. असं असताना आता ममता बॅनर्जी यांच्या दुखापतीची बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता यांना एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नेमकं काय घडलं?
ममता बॅनर्जी यांचा जखमी अवस्थेतील फोटो समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. देशभरात याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. नेमकं असं काय घडलं की ममता यांच्या कपाळाला एवढी मोठी दुखापत झाली? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ममता या आपल्या घरात ट्रेड मिल करताना (व्यायाम करताना) जमिनीवर कोसळल्या आहेत. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. यानंतर अभिषेक बॅनर्जी हे त्यांना तातडीने रुग्णालयात घेऊन गेले.
Our chairperson @MamataOfficial sustained a major injury. Please keep her in your prayers 🙏🏻 pic.twitter.com/gqLqWm1HwE
— All India Trinamool Congress (@AITCofficial) March 14, 2024
ममता यांना याआधीही झालीय अशाप्रकारची दुखापत
ममता बॅनर्जी यांना दुखापत होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीदेखील त्यांना अशाप्रकारे दुखापत झाली आहे. याचवर्षी जानेवारीत एका रस्ते अपघातात त्या जखमी झाल्या होत्या. त्यावेळी ममता या बर्धमान येथून कोलकाताच्या दिशेला जात होत्या. त्यावेळी पाऊस पडत असल्याने वातावरण खराब होतं. त्यामुळे त्या हवाई मार्गाने प्रवास करता आला नाही. त्या रस्ते मार्गाने कोलकाता परतत होत्या. यावेळी कारचा अचानक ब्रेक लागल्याने ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यात वेगळी गाडी आल्याने ड्रायव्हरला अचानक ब्रेक लावावा लागला होता. यामुळे ममता यांना दुखापत झाली होती.