मालदीवचं काय घेऊन बसलात? जगातली ही ठिकाणेही आहेत मस्त आणि स्वस्त
मालदीवच्या मंत्र्यांनी भारताची बदनामी केली. अशावेळी अनेक पर्यटकांनी मालदीवला पर्याय शोधण्यास सुरवात केली आहे. जगभरात काही महत्वाची ठिकाणे आहेत जी मालदीवपेक्षा स्वस्त आणि मस्त आहेत. इतकचं नव्हे तर या ठिकाणी भारतीय संस्कृतीही जपली जाते.
नवी दिल्ली | 08 जानेवारी 2024 : सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी भारतीयांची सर्वाधिक पसंती मालदीवला होती. पण, मालदीवच्या मंत्र्यांनी भारताची बदनामी केली. त्याचे दूरगामी परिणाम मालदीवच्या पर्यटनावर होणार आहेत. मालदीवच्या अध्यक्ष यांनी त्या मंत्र्यावर कारवाई केली तरीही भारतीयांची दुखावलेली मने पुन्हा काही सांधली जाणार नाहीत. अशावेळी अनेक पर्यटकांनी मालदीवला पर्याय शोधण्यास सुरवात केली आहे. जगभरात काही महत्वाची ठिकाणे आहेत जी मालदीवपेक्षा स्वस्त आणि मस्त आहेत. इतकचं नव्हे तर या ठिकाणी भारतीय संस्कृतीही जपली जाते.
ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना
व्हिएन्नामध्ये विविध संग्रहालये आणि रेस्टॉरंट्स आहेत. पायाभूत सुविधांच्या बाबतीत हे शहर सर्वोत्तम आहे. सार्वजनिक वाहतुकीची विश्वासार्हता, कॅफे, थिएटर्स आणि इतर मनोरंजन स्थळांमध्ये सहज प्रवेश या कारणांमुळे व्हिएन्ना शहर लोकाचे आवडते ठिकाण आहे. शॉनब्रुन पॅलेस, हॉफबर्ग आणि व्हिएन्ना सिटी हॉल अशा ऐतिहासिक इमारती येथे आहेत. आपल्या संगीत परंपरेसाठी हे शहर प्रसिद्ध आहे.
मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न आणि सिडनी ही दोन्ही शहरे संस्कृती आणि पर्यावरणाबाबत उत्कृष्ट आहेत. मेलबर्न जगप्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. मेलबर्नचा अनुभव घ्यायचा असेल कॅफेमध्ये बसून येथली सर्वोत्तम कॉफी घ्यावीच लागेल. मेलबर्नचे लोक आदरातिथ्य करण्यात वाकबगार आहेत.
व्हँकुव्हर, कॅनडा
कॅनडामधील व्हँकुव्हर शहरात जंगल, समुद्र आणि खूप सारं मोकळं आकाश आहे. येथील रस्ते इतके सुंदर आहेत की एका दिवसात समुद्रकिनाऱ्यावरून उंच पर्वतीय प्रदेशात जाता येऊ शकतं. मग हा प्रवास तुम्ही बस, सायकल किंवा बोटीनेही करू शकता. इथे इथिओपियन इंजेरा ते तिबेटी मोमोजपर्यंत सर्व काही मिळतं. जगातल्या विविध देशातील लोकांना हे ठिकाण भुरळ पाडते.
जपानचं ओसाका
ओसाका आशियातील एकमेव असे शहर आहे ज्याने स्थिरता, आरोग्य व्यवस्था आणि शिक्षणात 100% गुण मिळवले आहेत. हे अतिशय परवडणारं शहर आहे. ओसाकामध्ये जपान आणि जगातील इतर मोठ्या शहरांपेक्षा कमी भाडे आहे. ओसाकामध्ये चांगल्या रेस्टॉरंटमध्ये खूप स्वस्तात खाऊ शकता. इतर शहरांच्या तुलनेत हे शहर अधिक सुरक्षित मानलं जातं.
ऑकलंड, न्यूझीलंड
न्यूझीलंड देशातील ऑकलंड हे शहर संस्कृती आणि पर्यावरणाचा समतोल राखून आहे. शहराभोवती भरपूर हिरवळ आहे. जगातील अनेक देशांतील लोक येथे येतात. जगभरातील सर्व खाद्यपदार्थ इथे उपलब्ध आहेत. येथील सगळ्यांत चांगली गोष्ट म्हणजे लोकांचे स्वभाव. येथील लोक मदत करण्यास नेहमी तत्पर असतात. आपण जाता येता स्मितहास्य करून ते आपल्याला हाय, बाय करतात.