UNSC मध्ये सुधारणांबाबत भारत असं काय म्हणाला की चीनला लागली मिर्ची
UNSC : भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अशी काय भूमिका मांडली की, चीनला लगेच मिर्ची लागली आहे. भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यावर देखील जोर दिला. यावेळी त्यांनी चीनला नाव न घेता चपराक लगावली. भारताच्या या भूमिकेनंतर चीनने लगेचच यावर प्रतिक्रिया दिली आहे.
India in UNSC : जगात भारताचे महत्त्व वाढत असताना चीनला मात्र यामुळे टेन्शन आले आहे. अनेक मोठे देश भारताच्या बाजुने असल्याने चीनला ते खुपते आहे. त्यातच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायम सदस्यत्वाला आणि सुधारणांना विरोध करत असलेल्या चीनला मात्र हा आरोप मान्य नाही. गंभीर आणि सखोल चर्चेद्वारे पूर्ण तोडगा काढण्यासाठी शक्य तितक्या व्यापक सहमतीच्या गरजेवर भर देत असल्याचे चीनने म्हटले आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी म्हटले आहे की, जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्र प्रभावीपणे भूमिका बजावेल अशी जगाला आशा आहे. चीन, विकसनशील देशांच्या आवाजासह, UNSC सुधारणांच्या योग्य दिशेने सतत प्रगतीचे समर्थन करतो.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सदस्यांचा अदूरदर्शी दृष्टीकोन जागतिक संस्थेतील सुधारणांमध्ये अडथळा आणत असल्याचे म्हटलानंतर एका आठवड्यानंतर वांग यांची टिप्पणी आली आहे. चीनकडे लक्ष वेधून ते म्हणाले की UNSC मध्ये सुधारणांचा सर्वात मोठा विरोधक हा कोणताही पाश्चात्य देश नाही. जयशंकर यांनी चीनवर केलेल्या हल्ल्यानंतर आता चीनच्या बाजूने ही प्रतिक्रिया आली आहे.
आम्ही सुधारणांच्या विरोधात नाही: चीन
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, वांग म्हणाले की चीन योग्य दिशेने UNSC सुधारणांच्या निरंतर प्रगतीचे समर्थन करतो. बीजिंग यूएनच्या सर्वोच्च संस्थेत सुधारणा रोखत असल्याच्या टीकेबद्दल विचारले असता. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले की, UNSC मधील सुधारणा हा संयुक्त राष्ट्रांच्या एकूण सुधारणांचा अविभाज्य भाग आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाची एकता आणि सहकार्य राखणे हे प्राधान्य असायला हवे.
सदस्य राष्ट्रांनी गंभीर आणि गहन सल्लामसलत करून उपायांवर शक्य तितक्या व्यापक सहमती निर्माण करणे आवश्यक आहे. काही लोकांचे हित साधण्याऐवजी सर्व सदस्य राष्ट्रांना सुधारणांचा फायदा झाला पाहिजे असे ते म्हणाले. चीन विशेषत: स्थायी सदस्य म्हणून UNSC मध्ये भारताचा प्रवेश रोखत आहे का यावर त्यांनी थेट उत्तर दिले नाही.
कोणते देश स्थायी सदस्य होण्यासाठी इच्छूक
सुरक्षा परिषदेत दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या तातडीच्या सुधारणांसाठी संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रयत्न करण्यात भारत आघाडीवर आहे. भारत कायमस्वरूपी सदस्य म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या उच्च पटलावर स्थान मिळवण्याचा हक्कदार आहे असा आग्रह धरत आहे. भारताव्यतिरिक्त, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, जर्मनी आणि जपान सारखे देश समकालीन जागतिक वास्तव प्रतिबिंबित करण्यासाठी सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यांची संख्या वाढवण्याची मागणी करत आहेत.
रशिया, ब्रिटन, चीन, फ्रान्स आणि अमेरिका हे UNSC चे पाच स्थायी सदस्य आहेत. ते संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील कोणत्याही ठोस ठरावाला व्हेटो करू शकतात.