WITT 2024 : मीच सर्वाधिक राष्ट्रवादी; कंगना राणावत असं का म्हणाली?
कंगना राणावत हिमाचल प्रदेशातील आहे. ती हिमाचलमधून लोकसभेची निवडणूक लढवण्याची जोरदार चर्चा आहे. कंगनाने काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. त्यानंतर कंगना लोकसभा लढणार असल्याच्या चर्चा रंगल्या. जेपी नड्डा यांच्यासोबतच्या भेटीचा हा व्हिडीओ कंगनाने सोशल मीडियावर शेअर केला होता.
नवी दिल्ली ! 26 फेब्रुवारी 2024 : या देशाने मला सर्वकाही दिलं आहे. त्यामुळे मी देशासाठी काही तरी करावं ही माझी जबाबदारी आहे. मी नेहमीच स्वत:ला राष्ट्रवादी समजत आले आहे. माझी ही इमेज एक अभिनेत्री म्हणून माझ्या करिअरवर चांगलीच भारी पडली आहे, असं सांगतानाच प्रेक्षक माझ्यावर प्रेम करतात, त्यांना माझं काम आवडतं हे मला माहीत आहे, असं अभिनेत्री कंगना राणावत म्हणाली. टीव्ही9 नेटवर्कने व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या कॉन्क्लेव्हचं आयोजन केलं होतं. यावेळी कंगना राणावतची मुलाखत घेण्यात आली. यावेळी तिने ही रोखठोक भूमिका व्यक्त केली.
अभिनेत्री कंगना राणावत हिने यावेळी सिनेमा आणि सिनेमातील प्रवासावर भाष्य केलं. या देशातील लोकांनी मला पंख दिले. त्यामुळेच मी यशाची भरारी घेऊ शकले, असं सांगतानाच आपल्याला संस्कृती दर्शविणारे आणि वास्तववादी सिनेमे बनवण्याची गरज आहे, असं कंगना राणावत म्हणाली.
जमिनीशी नाळ असलेले सिनेमे हवे
आरआरआर असो, सत्यजीत रे यांचे सिनेमे असो किंवा स्लमडॉग मिलिनियर असो. ग्लोबल होण्यासाठी तुम्हाला लोकल व्हावं लागेल असं, सत्यजीत रे म्हणाले होते. मी सुद्धा या गोष्टीवर विश्वास ठेवते. आपल्याला ऑथेंटिक व्हायला पाहिजे. मातीशी नाळ असलेले सिनेमे केले पाहिजे. त्यात आपली संस्कृती आणि आपला संघर्ष असावा. आपल्या समाजातील द्वंद्व दाखवणाऱ्या कथा असल्या पाहिजे, असं कंगनाने सांगितलं.
देशाने पंख दिले
हिंदीतून तामिळ सिनेमात काम करण्याच्या निर्णयावरही तिने भाष्य केलं. या देशाने आणि देशातील लोकांनी मला पंख दिले आहेत. माझ्यावर खूप प्रेम केलंय. देशातील प्रत्येक कोपऱ्यातून मला प्रेम मिळालंय. मी नॉर्थच्या वरच्या भागातून येते. आणि मी साऊथ सिनेमात काम केलंय. मी दिल्लीची मुलगी आहे, पण हरियाणाच्या मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे. मी झांसी की रानीमध्येही काम केलंय, असं तिने स्पष्ट केलं.
कंगना लोकसभा लढवणार?
कंगना राणावत हिमाचल प्रदेशातील आहे. ती हिमाचलमधून लोकसभेची निवडणूक लढवण्याची जोरदार चर्चा आहे. कंगनाने काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. त्यानंतर कंगना लोकसभा लढणार असल्याच्या चर्चा रंगल्या. जेपी नड्डा यांच्यासोबतच्या भेटीचा हा व्हिडीओ कंगनाने सोशल मीडियावर शेअर केला होता. कुल्लूमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि त्यांची धर्मपत्नी मल्लिका नड्डा यांच्याशी झालेली भेट… असं पोस्टमध्ये तिने म्हटलं होतं. या भेटीत नड्डा यांनी केलेलं मार्गदर्शन, सहकार्य आणि सल्ल्याबद्दल आभारी असल्याचंही तिने म्हटलं होतं.