WITT 2024 : चीनची अर्थव्यवस्था अडचणीत का?; ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांकडून चिरफाड
ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांनी पाश्चात्य विचारवंतांवर जोरदार टीका केली आहे. भारताची लोकशाही समजून घेणं सोपी गोष्ट नाही, असं सांगतानाच भारत येत्या काळात सुपर पॉवर बनणार असल्याचा दावा टोनी अबॉट यांनी केला. नवी दिल्लीत टीव्ही9 नेटवर्कने व्हॉट इंडिया थिंक्स टुडेचं आयोजन केलं आहे. त्यात अबॉट यांनी संवाद साधताना चीनच्या अर्थव्यवस्थेची चिरफा़ड केली.
नवी दिल्ली ! 26 फेब्रुवारी 2024 : चीनची परिस्थिती दिवसे न् दिवस वाईट होत चालली आहे. कोरोना महामारीनंतर चीनची अर्थव्यवस्था मंदावली आहे. महामारीनंतरही अर्थव्यवस्था वाढू शकली नाही. त्यामुळे चीनची अर्थव्यवस्था दिवसे न् दिवस डुबू लागली आहे. चीनच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेचं ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांनी परखड विश्लेषण केलं आहे. टीव्ही9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या ग्लोबल समीटमध्ये टोनी अबॉट यांनी परखड मते मांडली. चीनची अर्थव्यवस्था अडचणीत का आहे याची माहिती दिली.
टीव्ही9च्या मंचावरून चीनच्या अर्थव्यवस्थेवर बोलताना ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट चांगलेच भडकले. चीनच्या बुडत्या अर्थव्यवस्थेला चीनच जबाबदार आहे. कोणतंही युद्ध न जिंकता चीनला जिंकायचं आहे. हे जगासाठी चांगले संकेत नाहीत, असं टोनी अबॉट म्हणाले. ऑस्ट्रेलिया आणि चीनच्या दरम्यान प्रशांत महासागरात चीनच्या दबदब्यावरून नेहमी वाद असतो. चीनच्या अडेलतट्टूपणावर ऑस्ट्रेलियाच्या सरकारने नेहमीच आक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर टोनी अबॉट यांनी चीनला पुन्हा एकदा आरसा दाखवण्याचं काम केलं आहे.
अर्थव्यवस्था का बुडतेय?
चीनच्या आर्थिक समस्येचं केंद्र रिअल इस्टेट मार्केट असल्याचं सांगितलं जात आहे. चीनच्या सरकारने बेरोजगारांचे आकडे देणं बंद केलं आहे. देशाची सर्वात मोठी रिअल इस्टेट फर्म कंट्री गार्डन आणि झोंग्रोंग ट्रस्ट डिफॉल्ट झाली आहे. चीनच्या अर्थव्यवस्था एक प्रकारची समाजवादी बाजार अर्थव्यवस्था आहे. राज्याच्या मालकीचे उद्योग आणि खासगी कंपन्यांनी बनून ही अर्थव्यवस्था तयार झाली आहे.
भारताची लोकशाही समजणे सोपे नाही
यावेळी टोनी अबॉट यांनी पाश्चात्य विचारवंतांवर टीका केली. भारताची लोकशाही समजून घेणं एवढं सोपं नाही. भारत येणाऱ्या काळात सुपर पॉवर बनेल, यात कोणतीच शंका नाही. भारताकडे नेहमीच ग्लोबल साऊथचं नेतृत्व राहिलं आहे. पण भारत कधीच आक्रमक झाला नाही. भारताने गट निरपेक्ष आंदोलनाचं नेतृत्व करत गरीब देशांच्या हक्कासाठी लढा दिला, असं त्यांनी सांगितलं. अबॉट यांनी क्वाड आणि नाटो दरम्यांचं अंतरही सांगितलं. क्वाड पाचव्या डोळ्यासारखं आहे. तर क्वाड ही संकल्पना देण्यात जपानचे पंतप्रधान शिंजो अबे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.