WITT 2024 : PM मोदी आणि वडिलांच्या PTM मध्ये काय झालं? स्मृति ईरानी यांनी काय सांगितलं?
टीव्ही9 नेटवर्कने व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समीटचं आयोजन केलं आहे. या समीटमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनीही संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. पश्चिम बंगालच्या संदेशखाली येथे महिलांवर अत्याचार होत आहेत. या मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह काँग्रेसवरही जोरदार टीका केली.
नवी दिल्ली ! 26 फेब्रुवारी 2024 : टीव्ही9 नेटवर्कने आयोजित केलेल्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समीटमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी त्यांचे वडील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा किस्सा ऐकवला. मी नेहमीच अडचणीत टाकते, असं वडिलांना वाटतंय. शाळेतील माझं रिपोर्ट कार्ड आणायचं असेल तर माझे वडील आधी नाणेफेक करायचे. पण माझे वडील PTMवर खूश होते, ही पहिलीच वेळ होती, असं स्मृती ईराणी म्हणाल्या.
केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुकही केलं. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्लासमधील विद्यार्थी असाल तर ती सन्मानाची गोष्ट आहे, ही वास्तव आहे. मी एका लिजेंडसोबत काम करत आहे, ही माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. ज्यांनी आर्टिकल 370 रद्द केलं, ज्यांनी महिलांना 33 टक्के आरक्षण दिलं आणि ज्यांनी रामलल्लाची प्रतिष्ठापना केली. मी इतिहासाची साक्षीदार झाले आहे. जो लिजंड इतिहास घडवत आहे, अशा व्यक्तीसोबत मी काम करतेय ही अभिमानाची गोष्ट आहे, असं स्मृती ईराणी म्हणाल्या.
रिपोर्टकार्डवर मोदींची सही
पास की फेल माहीत नाही… पण रिपोर्ट कार्डवर मोदींची असहीच त्याला अमूल्य बनवते, असं त्या म्हणाल्या. या आधी त्यांनी संदेशखालीच्या मुद्द्यावरून ममता बॅनर्जी सरकारसह काँग्रेसवरही टीका केली. जे झालं ते कोणत्याही व्यक्तीच्या विचाराच्या पलिकडचं आहे. अनाकलनीय आहे. ज्या लोकांनी ममता बॅनर्जी यांना वर्षानुवर्ष बळ दिलं, त्या महिलांना घरातून उचलून त्यांच्यावर बलात्कार केला जात आहे. हे अत्यंत चुकीचं आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
ममता बॅनर्जींवर टीका
वय आणि धर्म पाहून महिलांवर अत्याचार होत आहेत. राजकारण बाजूला ठेवा. पण काँग्रेस कार्यकर्त्यांचीही हत्या करण्यात आली. काँग्रेसच्या लोकांनाही पश्चिम बंगालच्या संदेशखालीत जाऊन बोलायचं आहे. पण युवराजांच्या राजकीय भुलभुलैयात काँग्रेस स्वत:ला शोधण्याचं काम करत आहे. त्यांच्याकडे या घटनेवर बोलायला एक शब्दही नाही, असा हल्लाच त्यांनी चढवला.