What India Thinks Today : पंजाबची हवा कुणाच्या बाजूने? आपची कामगिरी कशी होणार?; भगंवत मान सांगणार स्ट्रॅटेजी
टीव्ही9 नेटवर्कने व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या ग्लोबल समीटचं आयोजन केलं आहे. या समीटमध्ये देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्राचा आढावा घेतला जाणार आहे. देशातील बडे राजकारणी, उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या ग्लोबल समीटमध्ये भाग घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. यावेळी विदेशातील राजकीय नेतेही उपस्थित राहणार असल्याने या ग्लोबल समीटकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
नवी दिल्ली | 24 फेब्रुवारी 2024 : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याआधीच सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. आघाड्या आणि युती करण्याचं सत्रही सुरू झालं आहे. त्यातच आयाराम आणि गयारामांचंही पेव फुटलं आहे. त्यामुळे दर दहा पंधरा दिवसांनी राजकीय गणितं बदलताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत कुणाच्या बाजूने कल असेल हे तसं सांगणं अवघड झालेलं आहे. मात्र, प्रत्येक राजकारणी आमचाच विजय होईल असं सांगताना दिसत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही पंजाबची हवा कुणाच्या बाजूने असणार आहे हे सांगणार आहेत. टीव्ही9 नेटवर्कने आयोजित केलेल्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या ग्लोबल समीटमध्ये
राजधानी दिल्लीत तीन दिवस म्हणजे 25 ते 27 फेब्रुवारीपर्यंत व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समीट चालणार आहे. त्यातील सत्ता संमेलनात सात राज्यांचे मुख्यमंत्री सामील होणार आहेत. त्यातील पाच मुख्यमंत्री हे भाजपशासित राज्यातील आहेत. तर दोन मुख्यमंत्री हे आम आदमी पार्टीचे आहेत. पंजाबमध्ये आपचं सरकार आहे. पहिल्यांदाच आपच्या हाती पंजाबची सत्ता आली आहे. भगवंत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत. विधानसभेत पहिल्यांदाच घवघवीत यश मिळाल्यानंतर आपने आता लोकसभेसाठी कंबर कसली आहे. पंजाबमध्ये जास्तीत जास्त जागा मिळतील अशी आशा आपला वाटत आहे.
आपचा दावा काय?
आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि खुद्द पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे पंजाबमध्ये 13 पैकी 13 जागा जिंकण्याचा दावा करत आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत पंजाब काँग्रेसला 8 जागा मिळाल्या होत्या. तर अकाली दल आणि भाजपच्या आघाडीला फक्त चार जागा मिळाल्या होत्या. तर आम आदमी पार्टीला फक्त एक जागा मिळाली होती. विधानसभा निडणुकीत प्रचंड यश मिळाल्याने पंजाबची हवा अजूनही आपल्याच बाजूने आहे, असं आम आदमी पार्टीला वाटत आहे. त्यामुळेच आपकडून सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा दावा केला जात आहे.
कॉन्क्लेव्हमधी सत्ता संमेलनात आप का ‘मान’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. त्यात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आम आदमी पार्टीसमोरील आव्हाने, पक्षाची निवडणूक तयारी आणि विजयाची शाश्वती यावर भाष्य करणार आहेत. तसेच पंजाबमध्ये शेतकऱ्यांकडून सुरू असलेलं आंदोलन, त्यांच्याशी केंद्र सरकारकडून होणारा चर्चेचा प्रयत्न आणि पंजाब सरकारकडून केल्या जाणार्या प्रयत्नांवरही मान बोलण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये आप आणि काँग्रेसने एकत्र मिळून लढण्याचा निर्णय घेतला होता. जागा वाटपांची दोन्ही पक्षात चर्चाही झाली होती. पण चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी स्वबळाचा नारा दिला.
त्यामुळे आता पंजाबमध्ये इंडिया आघाडी राहणार नाही. आप आणि काँग्रेस एकमेकांच्या विरोधात लढणार आहे. त्याचा भाजप फायदा उठवू शकते. भाजपने अकाली दलाशी चर्चा सुरू केली आहे. तर दुसरीकडे पंजाबच्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असल्याने त्याचा भाजपला फटका बसण्याची शक्यताही आहे. या संपूर्ण परिस्थितीवर भगवंत मान सत्ता संमेलनात भाष्य करणार आहे. 27 तारखेला दिल्लीतील द अशोका हॉटेलमध्ये हे सत्ता संमेलन पार पडणार आहे.
केजरीवाल येणार
या सत्ता संमेलनात विरोधी पक्षाचे नेतेही आपली भूमिका मांडणार आहेत. काँग्रेस नेते पवन खेडा हे 2024मध्ये सत्ता कुणाची या विषयावर बोलतील. तर एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी हे सुद्धा देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणार आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपशी दोन हात करण्यासाठी कशा पद्धतीने तयारी करण्यात आलीय त्यावरही विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून माहिती दिली जाणार आहे.