कलम 370, राम मंदिर नंतर आता काय? अमित शाह यांंची बंगालमध्ये मोठी घोषणा
बंगालची राजधानी कोलकाता येथे एका सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. अमित शहा यांनी टीएमसीवर जोरदार हल्ला चढवला. शाह म्हणाले की, पीएम मोदी बंगालमध्ये पैसे पाठवतात, पण टीएमसीचे लोक हे पैसे गरिबांपर्यंत पोहोचू देत नाहीत.
Amit Shah on CAA : मोदी सरकारने त्यांच्या १० वर्षाच्या कार्यकाळात २ महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण केल्या आहेत. पहिले म्हणजे जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवणे आणि दुसरे म्हणजे राम मंदिर. राम मंदिराचे उद्घाटन सोहळा जानेवारीमध्ये होणार आहे. पण त्यानंतर मोदी सरकारचा पुढचा अजेंडा काय असणार आहे. याबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. बुधवारी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे एका रॅलीला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी CAA बाबत मोठे विधान केले. अमित शाह म्हणाले की, आम्ही CAA लागू करु. हा देशाचा कायदा आहे. आम्हाला कोणीही रोखू शकत नाही.
अमित शहा म्हणाले की, बंगालच्या जनतेने ठरवले आहे की पुढचे सरकार भाजपचेच येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगालच्या जनतेला लाखो रुपये पाठवतात, पण तृणमूल काँग्रेस हे पैसे गरिबांपर्यंत पोहोचू देत नाही. बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान सर्वाधिक हिंसाचार होत असल्याचे ते म्हणाले. बंगालमधील घुसखोरी रोखली जात नाही.
बंगालमध्ये निवडणुकीचा सर्वाधिक हिंसाचार
अमित शाह म्हणाले की, बंगालमध्ये कम्युनिस्टांनी 27 वर्षे राज्य केले. तिसऱ्या टर्ममध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार स्थापन झाले. दोघांनी मिळून बंगालचा नाश केला. संपूर्ण देशात निवडणुकीतील हिंसाचार बंगालमध्ये सर्वाधिक आहे. ममता बॅनर्जी बंगालमधील घुसखोरी रोखू शकलेल्या नाहीत. राज्यात घुसखोरांना मतदार कार्ड आणि आधार कार्ड खुलेआम वाटले जात असून ममता बॅनर्जी गप्प बसल्या आहेत.
बंगालमध्ये भ्रष्टाचार शिगेला
सोनार बांगलाचा नारा देत कम्युनिस्टांना हटवून ममता दीदी सत्तेवर आल्या. पण बंगालमध्ये बदल झाला नाही. आजही बंगालमध्ये घुसखोरी, तुष्टीकरण, राजकीय हिंसाचार आणि भ्रष्टाचार होत आहे. ज्या बंगालमध्ये एकेकाळी रवींद्र संगीत ऐकू येत होते ते आज बॉम्बस्फोटांनी गुंजत आहे. संपूर्ण देशातून गरिबी हटवली जात आहे, पण बंगालमध्ये तसे होताना दिसत नाही. बंगालमध्ये भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे.
2026 मध्ये भाजपचे सरकार स्थापन होणार
शाह म्हणाले की 2026 च्या निवडणुकीत बंगालमध्ये भाजपचे सरकार दोन तृतीयांश बहुमताने स्थापन होईल. पण त्याआधी 2024 च्या निवडणुका येत आहेत. 2019 मध्ये तुम्ही 18 जागा दिल्या. मी तुम्हाला 2024 मध्ये इतक्या जागा देण्याची विनंती करायला आलो आहे की मोदीजींना शपथेनंतर म्हणावे लागेल की मी बंगालमुळे पंतप्रधान झालो आहे. शाह म्हणाले की, मोदीजींनी संपूर्ण देशातून दहशतवाद संपवला आहे.