Chandrayaan-3 Update | जर विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हर जागे झाले नाही तर चंद्रयान-3 मोहिमेचे काय होणार ?
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सकाळी झाली आहे. इस्रोने विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हर यांना पुन्हा सक्रीय करण्याचा प्रयत्न चालु ठेवला आहे. परंतू यात यश आले नाही तर काय होणार ?
नवी दिल्ली | 23 सप्टेंबर 2023 : इस्रोच्या वतीने लॅंडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु आहे. शनिवारी 23 सप्टेंबर दुपारी 2 वाजेपर्यंत इस्रोचा विक्रम आणि प्रज्ञानशी संपर्क होऊ शकलेला नाही. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुर्योदय झाला आहे. परंतू अजूनही विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा सक्रीय करता आलेले नाही. त्यामुळे प्रश्न असा निर्माण झाला आहे की जर दोन्ही उपकरणे पु्न्हा सक्रीय झाली नाही तर पुढे काय होणार ? भारताचे महत्वाकांक्षी चंद्रयान-3 मोहीम फेल झाली असे म्हणणार का ? इस्रोने विक्रम आणि प्रज्ञानशी संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरुच ठेवणार असल्याचे म्हटले आहे. जर सिग्नल पाठवूनही जर संपर्क करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला तरही या मोहिमेवर काहीही परीणाम होणार नाही. कारण इस्रोने या मोहिमेत मिळवेला सर्व डाटा आणि माहिती सुरक्षित आहे.
चंद्रयान-3 च्या लॅंडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञानशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. परंतू तिकडून काही सिग्नल येत नाहीए..काही दिवसांपूर्वी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रात्र सुरु झाल्याने इस्रोने या दोन्ही उपकरणांना स्लीप मोडवर नेऊन ठेवले होते. दोन्ही उपकरणे स्लीप मोडवर गेल्याने मोहीमेचे दोन टप्पे यशस्वीपणे पार पडले आहेत. परंतू चंद्रावर दुसरा दिवस सुरु झाल्याने इस्रोने विक्रम आणि प्रज्ञानशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जर संपर्क झाला आणि विक्रम-प्रज्ञान पुन्हा सक्रीय झाले तर तिसरा टप्पा सुरु करता आला असता. ज्यामुळे बोनस वेळ मिळून अधिक माहीती मिळविता आली असती. परंतू जरी संपर्क नाही झाला तरी ही मोहीम संपूर्ण यशस्वी झालेली आहे.
स्लीप मोडवर गेले लॅंडर आणि रोव्हर
इस्रोचे अधिकारी नीलेश देसाई यांनी सांगितले की लॅंडर आणि रोव्हरला चंद्रावर रात्र झाली त्यावेळी स्लीप मोडवर टाकण्यात आले होते. चंद्रावर रात्रीचे तापमान उणे 0 ते 200 डीग्री मायनस मध्ये जाते. सुर्याच्या किरणांशिवाय बॅटरी रिचार्ज होणे कठीण आहे. 20-21 सप्टेंबरला चंद्रावर सुर्योदय सुरु झाला. इस्रोने या उपकरणांना चंद्राच्या एक दिवस ( पृथ्वीवरचे 14 दिवस ) काम करण्यासाठी तयार केले होते. परंतू इस्रोला ही उपकरणे स्लीप मोडवरुन पुन्हा सक्रीय होण्याची आशा आहे. सुर्याच्या किरणांनी रोव्हर आणि लॅंडरची बॅटरी चार्ज झाल्यावर ते पुन्हा सक्रीय होतील अशी इस्रोला आशा आहे.