अन् लेकाला भेटण्यासाठी पहिल्यांदाच हीरा बा पंतप्रधानांच्या निवासात गेल्या, तेव्हा नेमकं काय घडलं होतं…
आई पंतप्रधान निवासात आली होती. नंतर आई गुजरातला गेली. बऱ्याच काळानंतर आईसोबत वेळ घालवला. आई पहिल्यांदाच 7 आरसीआरमध्ये आली होती, असं मोदी यांनी म्हटलं होतं.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. हीरा बा या आपला सर्वात लहान मुलगा पंकजभाई मोदी यांच्यासोबत गांधीनगरमध्ये राहायच्या. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर त्या 2016मध्ये फक्त एकदाच पंतप्रधान निवासात गेल्या होत्या. त्यावेळी मोदी यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आईंसाठी वेळ काढला. त्यांनी आईला व्हीलचेअरवर बसवून पंतप्रधान निवासातील गार्डनमधून फेरफटका मारला होता.
हीरा बा पंतप्रधान निवासात येऊन गेल्या हे स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून सांगितलं होतं. हीरा बा पहिल्यांदाच 7 आरसीआरमध्ये आल्या होत्या. त्यांनी आईसोबतचे फोटोही शेअर केले होते. या फोटोत हीरा बा व्हीलचेअरवर बसलेल्या दिसत होत्या. त्यांच्या पाठी मोदी व्हीलचेअर चालवताना दिसत होते. दोघेही गार्डनमध्ये असून मोदी आईला कुठल्या तरी फुलाची माहिती देताना दिसत होते.
आई पंतप्रधान निवासात आली होती. नंतर आई गुजरातला गेली. बऱ्याच काळानंतर आईसोबत वेळ घालवला. आई पहिल्यांदाच 7 आरसीआरमध्ये आली होती, असं मोदी यांनी म्हटलं होतं.
मोदी आपल्या आईशी अत्यंत निकट होते. त्यामुळेच केव्हाही वेळ मिळाला किंवा गुजरातच्या दौऱ्यावर असतील तर मोदी वेळ काढून आईला भेटायला जात होते. अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमात मोदी आपल्या आईचा उल्लेख करायचे. अनेकदा तर आईच्या संघर्षाची कहानी सांगताना मोदी भावूक व्हायचे.
आजही भावूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही भावूक झाले. त्यांनी आईच्या निधानाचं वृत्त ट्विट करून दिलं. त्यानंतर त्यांनी आईच्या आठवणींनाही उजळा दिला.
शानदार शताब्दी ईश्वर चरणी लीन झाली. तपस्वीचा प्रवास, निष्काम कर्मयोगीचं प्रतिक आणि मूल्यांना वाहिलेलं आयुष्य या तीन गोष्टी मी नेहमीच आईमध्ये पाहिल्या आहेत, असं मोदींनी म्हटलं आहे.
आईचा 100वा वाढदिवस होता. त्यावेळी मी तिला भेटलो होतो. त्यावेळी तिने मला एक मंत्र दिला. तो मला नेहमीच स्मरणात आहे. काम बुद्धिने करा आणि जीवन शुद्धीने जगा, असं आई म्हणाली होती, असं भावनिक ट्विटही त्यांनी केलं आहे.