WhiteHat Jr : व्हाईटहॅट ज्युनिअरच्या तब्बल 800 कर्मचाऱ्यांचा राजीनामा! कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल
ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या 'व्हाईटहॅट ज्युनिअर'ने आपल्या कर्मचाऱ्यांना आता कार्यालयात बोलावण्यास सुरुवात केलीय. त्यामुळे मागील दोन महिन्यात या कंपनीच्या तब्बल 800 कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिलाय!
मुंबई : कोरोना प्रादुर्भावाच्या (Corona Outbreak) काळात अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरुन काम अर्थात वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितलं. यामागे कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षितता हे मुख्य कारण होतं. मात्र, अनेक कंपन्यांना त्याचा मोठा फायदाही झाला. अनेक कंपन्यांचा इन्फ्रास्ट्रक्चरवरील खर्च वाचला आणि काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांकडून वाढीव काम करुन घेतलं. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालाय. अनेक कंपन्यांनी आता कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्यास सुरुवात केलीय. असं असलं तरी अनेकांची वर्क फ्रॉम होम (Work From Home) करण्यास आजही पसंती आहे. त्यामुळे कंपनीने वर्क फ्रॉम होम बंद करुन कामासाठी कार्यालयात बोलावल्यावर अनेकजण राजीनामाही टाकत आहेत. ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या ‘व्हाईटहॅट ज्युनिअर’ने (WhiteHat Jr) आपल्या कर्मचाऱ्यांना आता कार्यालयात बोलावण्यास सुरवात केलीय. त्यामुळे या कंपनीच्या तब्बल 800 कर्मचाऱ्यांनी मागील दोन महिन्यात राजीनामा दिलाय!
पुढील काळात अजून राजीनामे पडणार?
मनी कंट्रोलने एका रिपोर्टच्या हवाल्यानं सांगितलं आहे की, व्हाईटहॅट ज्युनिअरने 18 मार्चला वर्क फ्रॉम होम बंद करण्याची घोषणा केली होती. सर्व कर्मचाऱ्यांना एका महिन्याच्या आत म्हणजे 18 एप्रिलपर्यंत कार्यालयात येण्याची सूचना केली. त्यामुळे जवळपास 800 कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिलाय. या सर्व कर्मचाऱ्यांना अजूनही वर्क फ्रॉम होम पॉलिसी हवी होती. त्यांची कार्यालयात येऊन काम करण्याची इच्छा आणि तयारी नव्हती. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सेल्स, कोडिंग आणि मॅथ टीममधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पुढील काळात अजून अनेक कर्मचारी राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
800 WhiteHat Jr employees resign after being asked to return to office
More than 800 employees of kids online coding learning startup WhiteHat Jr, which was acquired by BYJU’S, have resigned in the last 60 days after they were asked to return to their offices#byjus #whitehatjr
— venkatakrishna (@Venkyy___) May 11, 2022
कर्मचाऱ्यांचे कंपनीवर आरोप
राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी एकाने इंक42 ला सांगितले की कंपनीनी दिलेला एक महिन्याचा कालावधी पुरेसा नव्हता. कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक आणि इतर अनेक समस्या आहेत. काहींच्या मुलांच्या शाळेचा प्रश्न आहे तर काहींचे आई-वडील आजारी आहेत. अशावेळी इतक्या कमी वेळ देत कार्यालयात बोलावणं योग्य नाही. कंपनी घाट्यात आहे आणि गुंतवणूक कमी करण्यासाठी कंपनीने ही रणनिती आखल्याचा आरोपही कर्मचारी करत आहेत. तसंच एकाने कंपनीने आपलं नाव खराब न होऊ देता कॉस्ट कटिंगसाठी हा पर्याय निवडल्याचाही आरोप केलाय.
तर एकाने राजीनाम्याचं कारण पगार असल्याचं म्हटलंय. भरतीवेळी कर्मचाऱ्यांना गुरुग्राम, मुंबई आणि बंगळुरूत व्हाईटहॅट ज्युनिअरचं कार्यालय असल्याचं सांगण्यात आलं. या ठिकाणी कर्मचाऱ्यांना काम करण्यास सांगण्यात आलं. आता 2 वर्षे काम केल्यानंतर पगारवाढ व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केलीय. कारण, त्यांना आता मोठ्या शहरातील महागाईचा सामना करावा लागणार आहे.