नवी दिल्ली : भारतातील एका बलात्कार (Rape) प्रकरणात फरार असलेला आरोपी स्वामी नित्यानंद (Nityanand) अचानक चर्चेत आला आहे. त्याने कैलासा नामक एक काल्पनिक देश तयार केला आहे. या देशाची राजदूत म्हणून नित्यानंद याची शिष्या विजयप्रिया हिने नुकताच संयुक्त राष्ट्र परिषदेत एंट्री घेतली. त्यानंतर नित्यानंदची चर्चा सुरु झाली. विजयप्रियाने स्वतःला ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलास’ चे प्रतिनिधी म्हटले. संयुक्त राष्ट्रसंघात कैलासाची ती कायमस्वरूपी राजदूत आहे, असा दावा तिने केला.
विजयप्रिया नित्यानंद या संयुक्त राष्ट्रांच्या कार्यक्रमात बोलताना, युनायटेड स्टेट्स ऑफ कैलास हा हिंदूंचा पहिला सार्वभौम देश आहे, ज्याची स्थापना नित्यानंदांनी केली आहे, असे म्हटले. विजयप्रिया यांनी नित्यानंद यांचे हिंदूंचे ‘सर्वोच्च गुरु’ म्हणून उल्लेख केला. पण खरंच हा देश आहे का ? काय आहे यासंदर्भातील सत्य?
काय आहे दावे
दावा 1 : भारतातून फारर झाल्यानंतर, नित्यानंदने दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोरमध्ये जमीन खरेदी केली आणि तो आपला देश म्हणून घोषित केला. त्याला ‘कैलास’ असे नाव देण्यात आले. भारतापासून त्याचे अंतर सुमारे 17 हजार किलोमीटर आहे.
दुसरा दावा : कैलासाच्या वेबसाइटचा दावा आहे की, कैलास चळवळ अमेरिकेत सुरू झाली. त्याची स्थापना नित्यानंद यांनी केली होती. हा हिंदूंचा एकमेव आणि पहिला सार्वभौम देश आहे, असा दावा विजयप्रिया करते.
तिसरा दावा : कैलासाच्या वेबसाईटवर असा दावा करण्यात आला आहे की, हिंदू धर्म मानणारे 200 कोटी लोक त्यांच्या देशाचे नागरिक आहेत. त्यापैकी एक कोटी आदि शिव यांना मानणारे आहेत. परंतु विजयप्रिया नित्यानंद यांनी संयुक्त राष्ट्रात दावा केला की कैलासामध्ये 20 लाख स्थलांतरित हिंदू राहतात.
चौथा दावा : अलीकडे 13 जानेवारी रोजी कैलासाने अमेरिकेसोबत द्विपक्षीय करार झाल्याचा दावा केला आहे. अमेरिकेने कैलासाला मान्यता दिल्याचा दावाही केला जात आहे. विजयप्रिया नित्यानंद यांनी दावा केला होता की, कैलासाने 150 देशांमध्ये दूतावास आणि एनजीओ स्थापन केल्या होत्या.
पाचवा दावा : कैलासा देखील स्वतःचे संविधान असल्याचा दावा करतो. येथे धर्मग्रंथ आणि मनुस्मृतीवर आधारित कायदा चालतो, असा दावा केला जातो. येथील लोक मनूचे नियम पाळतात. कैलासाचे सरकार हे सर्वात महत्वाचे आणि अधिकृत धर्मशास्त्र मानते. वेबसाईटनुसार, प्राचीन भारतात या पुस्तकात असणाऱ्या नियमांचे पालन केले जात होते.
सहावा दावा : कैलास या वेबसाईटचा दावा आहे की, अत्याचारित हिंदूंना या देशात संरक्षण दिले जाते. येथे राहणारे हिंदू जात, लिंग असा कोणताही भेद न करता शांततेने राहतात.
सातवा दावा : वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, कैलासमध्ये इंग्रजी, संस्कृत आणि तमिळ भाषा बोलल्या जातात. देशाचा राष्ट्रीय प्राणी ‘नंदी’ आहे. देशाचे राष्ट्रीय फूल ‘कमळ’ आणि राष्ट्रीय वृक्ष ‘वट’ आहे.
आठवा दावा : कैलासाने स्वतःची रिझर्व्ह बँक असल्याचा दावाही केला आहे. त्याचे स्वतःचे चलन देखील आहे. रिझर्व्ह बँक आणि चलन ऑगस्ट 2020 मध्ये लाँच करण्यात आले.
नववा दावा : वेबसाईटवर दावा करण्यात आला आहे की, कैलासाचे स्वतःचे हिंदू विद्यापीठ आणि गुरुकुल देखील आहे. विद्यापीठात सुमारे 6 हजार अभ्यासक्रम शिकविले जातात, असा दावा केला जात आहे.
दहावा दावा : कैलासाचा राष्ट्रध्वज ‘ऋषभ ध्वज’ आहे. कैलासाच्या ध्वजावरही नित्यानंदांचे चित्र आहे. एवढेच नाही तर त्यांचे स्वतःचे राष्ट्रगीतही आहे. कैलासाच्या वेबसाइटवर राष्ट्रगीत हिंदी, इंग्रजी आणि तमिळ भाषांमध्ये उपलब्ध आहे.