AAP Punjab RS Nominations: कोण आहेत संदीप पाठक ज्यांना आपचे ‘अमित शाह’ म्हटलं जातं, ज्यांना केजरीवालांनी राज्यसभेवर पाठवलं?
आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) अमित शहा आणि चाणक्य म्हणून ज्यांची राजकारणात ओळख आहे, त्या संदीप पाठक यांना आपने पंजाबमधून राज्यसभेचं तिकीट दिलं आहे. पाठक यांनी राज्यसभेसाठी नामांकन अर्जही भरला आहे.
चंदीगड: आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) अमित शहा आणि चाणक्य म्हणून ज्यांची राजकारणात ओळख आहे, त्या संदीप पाठक यांना आपने पंजाबमधून राज्यसभेचं तिकीट दिलं आहे. पाठक यांनी राज्यसभेसाठी नामांकन अर्जही भरला आहे. पंजाबच्या विजयात संदीप पाठक यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यांनी गेल्या तीन वर्षापासून पंजाबमध्ये तळ ठोकून बुथ लेव्हलला संघटना मजबूत केली होती. त्यामुळेच पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवलं आहे. ते आयआयटीमध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत. ते आपचे राष्ट्रीय संयोजक आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणूनही ते ओळखले जातात. पाठक यांच्यापाठोपाठ आपने क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh), अशोक मित्तल, संजीव अरोरा आणि दिल्लीचे आमदार राघव चड्ढा (MLA Raghav Chadha) यांनाही राज्यसभेवर पाठवलं आहे.
पंजाबमध्ये पाच राज्यसभेच्या जागेसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. येत्या 31 मार्च रोजी पंजाबमध्ये निवडणुका व्हायच्या आहेत. राज्यातील विद्यमान पाच राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ येत्या 9 एप्रिल रोजी संपत आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीने पाच जणांची नावे जाहीर केली आहेत. आपने या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत 117 पैकी 92 जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे आपच्या पाचही उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे.
केंब्रिजमधून पीएचडी
संदीप पाठक हे छत्तीसगडच्या मुंगेली जिल्ह्यातील लोरमीचे रहिवाशी आहेत. 4 ऑक्टोबर 1979 ही त्यांची जन्म तारीख. संदीप यांना एक बहीण आणि एक भाऊ आहे. त्यांच्या छोट्या भावाचे नाव प्रदीप पाठक तर बहिणीचे नाव प्रतिभा पाठक आहे. त्यांनी बिलासपूरमध्ये एमएसीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर ब्रिटनमध्ये केंब्रिज विद्यापीठातून पीएचडी केली आणि भारतात परतले.
केजरीवालमुळे प्रभावीत होऊन आपमध्ये
संदीप पाठक यांना आपचे चाणक्य म्हणून ओळखलं जातं. त्यांनी पडद्याच्या मागे राहून आपच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संदीप पाठक दिल्ली आयआयटीमध्ये प्राध्यापक आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यामुळे प्रेरित होऊन त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. पाठक यांनी 2011मध्ये केंब्रिज विद्यापीठातून पीएचडी केली आहे. पंजाबमध्ये बुथ लेव्हलवर जाऊन त्यांनी काम केल्याने त्यांना यश मिळालं आहे. प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत संदीप पाठक यांनी काम केलं आहे. त्यानंतर ते अरविंद केजरीवाल यांच्या सल्ला देणाऱ्या टीममध्ये सामील झाले. पंजाबमध्ये कशा पद्धतीने विजय मिळवायचा याचा आराखडाच त्यांनी तयार केला होता. राज्याचं तंतोतंत सर्वेक्षण, उमेदवारांची निवड आणि उमेदवारांच्या विजयाची रणनीती बनविण्यात संदीप पाठक माहीर असल्याचं सांगितलं जात आहे.
संबंधित बातम्या:
Punjab: आपकडून राज्यसभेसाठी कुलगुरू अशोक मित्तल आणि हरभजन सिंग, आज अर्ज भरणार
जगातील सर्वात लोकप्रिय नेता म्हणून पंतप्रधान मोदींची निवड; बिडेन यांच्या मागे शुक्लकाष्ठ!