Siddaramaiah : मुलाच्या अकाली निधनाने खचले नाही, काँग्रेसला एक हाती सत्ता मिळवून दिली, कोण आहेत सिद्धारमैया?
कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदाचा पेच अखेर सुटला आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची माळ सिद्धारमैया यांच्या गळ्यात पडल्याचं सूत्रांनी सांगितलं. डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदासह महत्त्वाची खाती देण्यात येणार आहेत.
बंगळुरू : कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून सिद्धारमैया यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे. मुख्यमंत्री म्हणून ते दुसऱ्यांदा कारभार पाहणार आहेत. सिद्धारमैया बुजुर्ग काँग्रेस नेते आहेत. उच्च शिक्षित आहेत. तसेच प्रशासनावर त्यांची मजबूत पकड आहे. सिद्धारमैया हे धनगर समाजातील आहेत. कर्नाटकात धनगर समाज मोठ्या प्रमाणावर असून या वर्गावर सिद्धारमैया यांचा मोठा प्रभाव आहे. आताही त्यांनी कर्नाटकात काँग्रेसला सत्ता मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच काँग्रेस हायकमांडने त्यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वातंत्र्याच्या 12 दिवस आधी जन्म
सिद्धरामैया यांचा स्वातंत्र्याच्या 12 दिवस आधी जन्म झाला. 3 ऑगस्ट 1947 रोजी मैसूर येथील एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. सिद्धारमैया यांचे वडील सिद्धारमे गौडा हे मैसूरच्या केटी नरसीपुरा येथे वरुणा होबलीमध्ये शेती करायचे. त्यांची आई बोरम्मा या गृहिणी होत्या. सिद्धारमैया यांना पाच भाऊ बहीण आहेत. ते भावंडांमध्ये दुसऱ्या क्रमांकवर आहेत. सिद्धरामैया हे स्टेट बोर्डाचे टॉपर होते. त्यांनी मैसूर विद्यापीठातून बीएससीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी एलएलबीची पदवी घेतली होती.
मुलाचं अकाली निधन
सिद्धारमैया यांच्या पत्नीचं नाव पार्वती सिद्धारमैया आहे. त्यांना दोन मुले होती. त्यापैकी मोठा मुलगा राकेश याचं 2016मध्ये वयाच्या 38 व्या वर्षी निधन झालं. मल्टी ऑर्गन फेल्यूअरमुळे त्यांचं निधन झालं. मुलाच्या निधनानंतर सिद्धारमैया कोलमडून गेले होते. अशीवेळ कोणत्याच आईबापावर येऊ नये, असं भावनिक उद्गार त्यावेळी त्यांनी काढलं होतं. सिद्धारमैया यांचा दुसरा मुलगा यतींद्र 2018मध्ये आमदार बनला. मात्र, यावेळी काँग्रेसने त्यांना तिकीट दिलं नाही.
सिद्धा ते सिद्धारमैया
सिद्धा म्हणून प्रसिद्ध असलेलेल सिद्धारमैयानंतर राजकारणात आले आणि राजकारणातील एक मोठा चेहरा म्हणून उदय पावले. त्यांनी 1983मध्ये पहिल्यांदा लोकदलाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. चामुंडेश्वरी विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले होते. त्यांनी 2013मध्ये कर्नाटकात काँग्रेसला सत्ता मिळवून दिली. त्यामुळे त्यांना काँग्रेसने मुख्यमंत्रीपद बहाल केले.
सिद्धारमैया यांनी आपल्या आयुष्यात 12 निवडणुका लढल्या. त्यातील 9 निवडणुकांमध्ये त्यांना विजय मिळाला. त्यांनी 1994मध्ये जनता दल सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. प्रशासनावर प्रंचड पकड असलेला नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. सिद्धारमैया हे जेडीएसमध्ये होते. 2008मध्ये त्यांना जेडीएसमधून काँग्रेसमध्ये आणण्यात मल्लिकार्जुन खरगे यांचा मोठा वाटा होता. सिद्धारमैया हे खरगे यांचे निकटवर्तीय समजले जातात.
सर्वात मोठे ओबीसी नेते
सिद्धारमैया यांनी 2103 ते 2018पर्यंत कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं. या काळात त्यांनी टिपू सुल्तानला कर्नाटकाचा नायक म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुस्लिम समाजातही ते लोकप्रिय ठरले होते. ते कुरुबा समुदाय (ओबीसी)मधून येतात. कुरुबा समुदाय हा कर्नाटकातील तिसरा मोठा समुदाय आहे. तसेच कर्नाटकातील सर्वात मोठे ओबीसी नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. डीके शिवकुमार यांच्या तुलनेत सिद्धारमैया हे खरे लोक नेते आहेत.