पाकिस्तानमधील सर्वात पावरफूल व्यक्ती कोण? या व्यक्तीच्या हातात आहे अणुबॉम्बचा रिमोट
दोन्ही देशांकडे अण्वस्त्रं आहेत, पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. युद्धाचं सावट निर्माण झालं आहे.

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. भारतानं पाकिस्तानचं पाणी बंद केलं आहे. सिंधु नदी जलवाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे, तसेच अटारी बॉर्डर बंद करण्यात आली आहे. सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तानचा थयथयाट सुरू आहे. पाकिस्ताननं देखील भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घातली आहे.
दरम्यान भारतानं सिंधु नदी पाणी वाटप कराराला स्थगिती दिल्यानं पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना मोठं वक्तव्य केलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये जो वाद सुरू झाला आहे, त्याचं रुपातंर एका मोठ्या युद्धात होऊ शकतं, असं संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं आहे. भारताच्या प्रत्येक कृतीला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ असं देखील त्यांनी म्हटलं आहे. जर काही गोष्टी चुकीच्या दिशेनं गेल्या तर त्याचे परिणाम खूप गंभीर होऊ शकतात, दोन्ही देशांकडे अण्वस्त्रं आहेत, हे देखील विसरून चालणार नाही, त्यामुळे चर्चेच्या माध्यमातूनच हा प्रश्न सोडवावा लागेल असं पाकच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे.
दोन्ही देशांकडे अण्वस्त्रं आहेत, पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. युद्धाचं सावट निर्माण झालं आहे. अशा स्थितीमध्ये अनेकांना हा प्रश्न पडला आहे की, पाकिस्तानमध्ये अणुबॉम्बचं नियंत्रण नेमकं कोणाकडे आहे? पाकिस्तानमध्ये अणुबॉम्बचा रीमोट हा तेथील पंतप्रधानांच्या हातात आहे, त्यांनाच याबाबतीत सर्व निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पंतप्रधानांव्यतिरिक्त पाकिस्तानमध्ये एनसीसीएस नावाची एक यंत्रणा देखील आहे, तिच्यावर देखील या संदर्भात मोठी जबाबदारी आहे.
दरम्यान दुसरीकडे पाकच्या पंतप्रधानांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे, आम्ही या हल्ल्याच्या निष्पक्ष चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करू, मात्र पाणी अडवल्यास जशास तसे उत्तर देऊ असं त्यांनी म्हटलं आहे.