मोदींचे धक्कातंत्र: लोकसभा किंवा राज्यसभा खासदार नाही…, फक्त शपथग्रहण समारंभ पाहण्यासाठी गेले…अन् मंत्री होऊन परतले
Modi 3.0 Who is George Kurian: केरळमध्ये भाजपसोबत आलेले ख्रिश्चन समाजातील अनेक नेते आहेत. तरीही कुरियन यांच्यावर विश्वास ठेवण्याचे कारण त्यांनी भाजपशी असलेली निष्ठा आहे. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे.
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार सत्तेवर आले आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत 72 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु या मंत्रिमंडळात एकही मुस्लिम नेता नाही. त्यांच्या मंत्रिमंडळात अल्पसंख्याक समाजाचे पाच मंत्री आहेत. त्यात एक मंत्री जॉर्ज कुरियन असून त्यांची चर्चा होत आहे. ते लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य नाही. परंतु ते अल्पसंख्याक कल्याण राज्यमंत्री झाले. ते केरळमधून येतात. ख्रिश्चन समाजातून आलेले आहेत. त्यांना मंत्रिपद देण्यामागे खिश्चिन समाजास आपल्याकडे खेचण्याची रणनीती आहे. केरळमध्ये हिंदू, मुस्लिम अन् ख्रिश्चन या तीन धर्मांच्या लोकांची लोकसंख्या आहे.
समारंभ पाहण्यासाठी आले अन् मंत्री झाले
केरळमध्ये भाजपला हिंदू समाजाचा पाठिंबा मिळतो. मुस्लिम समुदाय काँग्रेससोबत असतो. ख्रिश्चन समाज वामपंथीसोबत जातो. आता जॉर्ज कुरियन यांना ज्या पद्धतीने मंत्रिपद दिले गेले त्याचा धक्का स्वत: कुरियन अन् सर्वांना बसला आहे. कारण जॉर्ज कुरियन शनिवारी संध्याकाळी मोदी 3.0 चा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी दिल्लीत आले होते. परंतु त्यांना मंत्री म्हणून शपथ घ्यावी लागणार असल्याचा निरोप रविवारी मिळाला. त्यावेळी त्यांनाही धक्का बसला. कारण ते लोकसभा किंवा राज्यसभेचे सदस्य नाहीत किंवा त्यासंदर्भात कोणाशी त्यांची काहीच चर्चा झाली नाही.
का कुरियन यांना दिले मंत्रिपद
केरळमध्ये भाजपसोबत आलेले ख्रिश्चन समाजातील अनेक नेते आहेत. तरीही कुरियन यांच्यावर विश्वास ठेवण्याचे कारण त्यांनी भाजपशी असलेली निष्ठा आहे. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे. ते अनेक दशकांपासून भाजपमध्ये सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांना संधी देणे हेही निष्ठेचे बक्षीस आहे. याशिवाय भाजपला ख्रिश्चन समुदायातून स्वतःच्या विचारसरणीत वाढलेला नेता तयार करायचा आहे.
आता कुरियन म्हणतात…
सायरो-मलबार कॅथोलिक चर्चशी संबंधित जॉर्ज कुरियन केरळमध्ये चांगलेच सक्रिय आहेत. राज्यातील ख्रिश्चन समाजातील लोकांमध्ये भाजप वाढवण्याचा ते प्रयत्न करत आले आहे. मंत्रीपद मिळाल्यानंतर ते म्हणतात की, मला अल्पसंख्याक मंत्रालयाची जबाबदारी मिळाली आहे. त्यात मी पूर्ण क्षमतेने काम करेन. मी माझ्या समाजासह संपूर्ण अल्पसंख्याक समाजाच्या हितासाठी काम करेन. त्यांच्याकडे पशुसंवर्धन खात्याच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारीही आली आहे.