वर्धमानला पकडल्यानंतर नेमकं काय घडलं, इम्रान खान का करत होते मोदींना फोन
बालाकोट एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून देखील काही कारवाई होईल अशी शक्यता होती. तसेच झाले, पाकिस्तानची हवाई दलाने भारतात घुसण्याचा प्रयत्न केला पण भारतीय हवाई दलाने देखील त्यांना लगेच प्रत्यूत्तर दिले. यादरम्यान भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन वर्धमान विमान क्रॅश झाल्याने पाकिस्तानात उतरले होते.
मुंबई : भारतीय हवाई दलाचे पायलट अभिनंदन वर्धमान यांचं विमान पीओकेमध्ये कोसळल्यानंतर त्यांना पाकिस्तान रेजंर्सने ताब्यात घेतले होते. त्यांना पाकिस्तान सोडणार नसल्याचं बोललं जात होतं. पण त्यावेळी भारताने पाकिस्तानच्या दिशेने 9 क्षेपणास्त्रे वळवल्याने त्यांना पाकिस्तानला सोडावचं लागलं. त्यावेळी पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली होती. या दरम्यान दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता. भारताचे क्षेपणास्त्रे सीमेकडे वळवताच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या लष्कराचे इरादे बदलले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलण्यासाठी इम्रान खान सतत फोन करत होते.
माजी उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी त्यांच्या पुस्तकात हा उल्लेख केला आहे. या पुस्तकात त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. अजय बिसारिया यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, इम्रान खान यांना थेट पंतप्रधान मोदींशी बोलायचे होते. 27 फेब्रुवारी 2019 ची ही घटना आहे जेव्हा अभिनंदन वर्धमानने पाकिस्तानी F-16 विमान पाडले होते.
भारतीय वैमानिक अभिनंदन वर्धमानला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतल्यानंतर काही व्हिडिओ समोर आले होते.पंतप्रधान मोदी यांनी क्षेपणास्त्रे पाकिस्तानकडे वळवण्याचे आदेश दिल्यानंतर पाकिस्तानची अवस्था बिकट झाली. भारतीय लष्कराची ही तयारी पाहून पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी सरकार हादरले होते.
अजय बिसारिया यांनी सांगितले की, वर्धमानला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतल्यानंतर भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्त सोहेल महमूद यांचा पाकिस्तानातून लगेच फोन आला. इम्रान खान यांना पंतप्रधान मोदींशी बोलायचे आहे असा संदेश त्यांना देण्यात आला. पण पंतप्रधान मोदी पुढील काही तास उपलब्ध नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.
28 फेब्रुवारी रोजी वर्धमानला शांतता प्रस्थापित करण्यासाठी सोडत असल्याचं पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी म्हटले होते. पण भारताच्या क्षेपणास्त्रांच्या भीतीने पाकिस्तानने वर्धमाननला सोडले. भारताने कारवाईबाबत अमेरिका आणि इंग्लंडला देखील माहिती दिली होते. भारताने अमेरिका आणि ब्रिटीश राजदूतांना आपल्या हालचालींची माहिती दिली होती.
पाकिस्तान वर्धमानला सोडण्याच्या तयारीत नव्हता ही माहिती राजदूतांनी भारताच्या परराष्ट्र सचिवांना दिली होती. त्यामुळे भारताने कडक कारवाईची तयारी केली होती. भारताने यासोबत मुत्सद्दी पावलेही उचलली गेली. 2019 मध्ये एका निवडणूक रॅलीत पीएम मोदी म्हणाले होते की, जर पाकिस्तानने वर्धमान सोडला नसता, तर ती खुनाची रात्र झाली असती. अजय बिसारिया यांच्या पुस्तकात बालाकोट एअरस्ट्राईकची सविस्तर माहिती दिली आहे.