कॉलेजबद्दल इतकं प्रेम की एका झटक्यात देऊन टाकले 315 कोटी, कोणी दिली इतकी मोठी देणगी?
कोणत्याही माजी विद्यार्थ्याने आपल्या संस्थेला किंवा महाविद्यालयाला दिलेली ही सर्वात मोठी देणगी आहे.
नवी दिल्ली : जगात अनेक दानशूर व्यक्ती आहेत. देणगी करणाऱ्यांची सर्वच स्तरातून नेहमीच स्तुती होत असते. आता इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांनी 315 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्यांनी आपल्या संपत्तीचा मोठा भाग इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉम्बेला दान केलाय. कोणत्याही माजी विद्यार्थ्याने आपल्या संस्थेला किंवा महाविद्यालयाला दिलेली ही सर्वात मोठी देणगी आहे. आयआयटी बॉम्बेमधून उत्तीर्ण होऊन 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी देणगी जाहीर केलीये.
आतापर्यंत 400 कोटींची देणगी
याआधीही त्यांनी IIT बॉम्बेला 85 कोटींची देणगी दिली होती. आजपर्यंत त्यांनी आयआयटी बॉम्बेला सुमारे 400 कोटी रुपये देणगी म्हणून दिले आहेत. त्यांनी 1973 साली IIT बॉम्बे मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर पदवी मिळवली होती. आयआयटी बॉम्बेच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या उदयोन्मुख क्षेत्रातील संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि टेक स्टार्टअप्ससाठी नवीन इकोसिस्टम विकसित करण्यासाठी ही देणगी त्यांनी दिलीये.
सोशल मीडियावर पोस्ट
देणगी दिल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिलीये. ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, आयआयटी-बॉम्बे माझ्या आयुष्याचा आधारस्तंभ आहे. या संस्थेने माझ्या आयुष्याला आकार दिला आणि माझ्या प्रवासाचा पाया घातला. ही देणगी आर्थिक योगदानापेक्षा जास्त आहे. माझ्याकडून मिळालेले हे सहकार्य या संस्थेला दिलेला आदर आहे. ज्या संस्थेने मला खूप काही दिले आहे. फक्त मीच नाही तर येणारी पिढी घडवणार आहे.
कोण आहेत नंदन नीलेकणी
नंदन नीलेकणी यांचा जन्म 2 जुलै 1955 रोजी कर्नाटकात झाला. सुरुवातीच्या शिक्षणानंतर त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून इंजिनीअरिंग केले. शिक्षणादरम्यान त्यांची रोहिणीशी भेट झाली. पुढे दोघांनी लग्न केले. नंदन नीलकणी यांना दोन मुले आहेत. ते इन्फोसिसचे सह-संस्थापक राहिले आहेत. त्याचे सर्वात मोठे यश म्हणजे आधार कार्ड.
देशातील प्रत्येक नागरिकाला युनिक आयडेंटिफिकेशन नंबर किंवा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर देण्याची योजना त्यांनी यशस्वीपणे राबवली. आधार कार्ड योजनेचे श्रेय नंदन निलेकणी यांना जाते. 2006 मध्ये त्यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. टोरंटो विद्यापीठातून त्यांनी कायद्याची डॉक्टरेट पदवी घेतली आहे. 2006 मध्ये, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने त्यांना सर्वात तरुण उद्योजक म्हणून टॉप 20 ग्लोबल लीडर्समध्ये स्थान मिळवून दिले.