Ayodhya Ram Mandir | 5 महिन्यापूर्वी लग्न, आता अयोध्येवरुन संसार मोडण्याच्या मार्गावर, नेमकं काय घडलय?
Ayodhya Ram Mandir | सध्या देशातील बहुतांश जणांना अयोध्येला जाऊन रामललाचे दर्शन घेण्याचे वेध लागले आहेत. मागच्या दोन दिवसात, तर अयोध्येत अलोट गर्दी उसळली होती. आता अयोध्येवरुन एक संसार मोडण्याच्या मार्गावर आहे. महत्त्वाच म्हणजे या जोडप्याच्या लग्नाला पाचच महिने झालेत.
Ayodhya Ram Mandir | सध्या देशात राम मंदिराची चर्चा आहे. सोमवारी 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून अयोध्येत प्रभू रामचंद्रांच दर्शन घेण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी उसळली आहे. आता एका कुटुंबात अयोध्येला जाण्यावरुन मोठा वाद झालाय. हे प्रकरण थेट न्यायालयात पोहोचलय. एक संसार उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील हे प्रकरण आहे. या प्रकरणात नवऱ्याने बायकोला गोव्याचा नेण्याचा शब्द दिला होता. पण अचानक तो तिला गोव्याऐवजी अयोध्येला घेऊन गेला. म्हणून पत्नीने कौटुंबिक न्यायालयात अर्ज करुन घटस्फोटाची मागणी केली आहे. सध्या पती-पत्नी दोघांची काऊन्सिलिंग सुरु आहे.
भोपाळच्या पिपलानी भागातील हे प्रकरण आहे. रिलेशनशिप काऊन्सिलर शैल अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांच लग्न मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात झालं होतं. नवरा आयटी इंजिनिअर असून त्याला चांगला पगार आहे. लग्नानंतर पती-पत्नीची हनिमूनला जाण्याबद्दल चर्चा झाली. बायकोला कुठल्यातरी परदेशी पर्यटनस्थळी जायच होतं. त्याचवेळी नवऱ्याने वृद्ध आई-वडिलांच कारण देऊन भारतात कुठल्यातरी पर्यटन स्थळी जाऊ असं सांगितलं. त्यावेळी दोघांनी एकमताने गोव्याला जायच ठरवलं.
बायकोला सांगितलं ‘आईला मंदिरात दर्शन करायच आहे’
पत्नीचा आरोप आहे की, फिरण्याची तारीख जवळ आली, त्याच्या एकदिवस आधी नवऱ्याने सांगितलं की, “आपण धार्मिक स्थळ अयोध्या आणि वाराणसीला चाललो आहोत. आईला मंदिरात दर्शन करायच आहे” पत्नी नवऱ्यासोबत ट्रिपला गेलीच. पण तिथून आल्यानंतर दोघा पती-पत्नींमध्ये बराच वाद झाला. पत्नीने कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केलाय.
संसार टिकवण्यासाठी शेवटचे प्रयत्न
रिलेशनशिप काऊन्सिलर शैल अवस्थी यांनी सांगितलं की, पत्नी या प्रकाराला तिची फसवणूक मानत आहे. तिचा आरोप आहे की, नवरा कुटुंबीयांना जास्त वेळ देतो. त्यामुळे लग्न झाल्यापासून माझ्याकडे दुर्लक्ष होतय अशी तिची भावना आहे. संसार टिकवण्यासाठी सध्या पती-पत्नी काऊन्सिलिंग सुरु आहे.